भारतातील लुडबूड थांबवा -गृहमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2015 11:53 PM2015-05-27T23:53:56+5:302015-05-27T23:53:56+5:30
भारताच्या अंतर्गत मुद्यांवर लुडबूड करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बुधवारी कडक शब्दात ताकीद दिली.
जम्मू : भारताच्या अंतर्गत मुद्यांवर लुडबूड करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बुधवारी कडक शब्दात ताकीद दिली. पाकिस्तानला स्वत:च्या कल्याणाची चिंता असल्यास त्याने भारताविरुद्धच्या आपल्या कारवाया बंद कराव्यात व इतर देशांच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये विनाकारण लुडबूड करू नये,असे त्यांनी सुनावले.
येथे जनकल्याण पर्वाला मार्गदर्शन करताना गृहमंत्र्यांनी उपरोक्त भूमिका मांडली. भारताने पाकसह आपल्या शेजारील देशांकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे; परंतु पाकिस्तानने नेहमीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे ते म्हणाले.
फुटीरवाद्यांना सज्जड दम
सर्व वादग्रस्त मुद्यांवर चर्चेची इच्छा बाळगणाऱ्यांबाबत मवाळ भूमिका घेतानाच भारताच्या भूमीत पाकिस्तानसमर्थनात नारेबाजी करणारे व त्या देशाचा झेंडा फडकविणाऱ्यांना कदापि सहन केले जाणार नाही,असा सज्जड दम केंद्र सरकारने फुटीरवाद्यांना दिला आहे. लोकशाहीमध्ये संवादाचा मार्ग नेहमीच खुला असतो; परंतु भारतात पाकचे झेंडे फडकविणाऱ्यांना मात्र त्यांच्या या कृत्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ते म्हणाले.
गृहमंत्री जम्मूच्या दौऱ्यावर आले असताना प्रस्तावित एम्स काश्मीरला स्थलांतरित करण्याच्या विरोधात एम्स समन्वय समितीच्या वतीने शहरात एक दिवसाच्या बंदचे आयोजन करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)