मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी शहिदांचे वाहन थांबविले
By admin | Published: April 27, 2017 01:13 AM2017-04-27T01:13:05+5:302017-04-27T01:13:05+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जवानांचे मृतदेह घेऊन निघालेले वाहन थांबवून ठेवण्यात आले होते. मंगळवारी हा प्रकार येथे घडला. छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २६ जवान ठार झाले होते. त्यात बिहारमधील सहा जवानांचा समावेश आहे. या जवानांचे मृतदेह घेऊन पाटणा विमानतळाकडे निघालेल्या ट्रकला नितीशकुमार यांना घेऊन निघालेल्या वाहनांना रस्ता देण्यासाठी थांबवण्यात आले होते.
हुतात्मा जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाला पाहून मुख्यमंत्र्यांनी थांबून त्यांना सलामी द्यायला हवी होती. विमानतळावर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ना मुख्यमंत्री गेले ना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, असेही वृत्तात म्हटले.
राज्यमंत्र्यांची टीका-
या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही मुख्यमंत्री थांबले नाहीत. नितीशकुमार चित्रपट पाहून घरी परतत असताना त्यांची वाहने ज्या रस्त्याने गेली त्याच रस्त्याने मृतदेह घेऊन निघालेला ट्रक जाणार होता. नितीशकुमार यांचे वर्तन हे असंवेदनशील व दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामीण विकास राज्यमंत्री राम कृपाल यादव यांनी व्यक्त केली.
नितीशकुमार यांचे निवासस्थान पाटणा विमानतळापासून अवघ्या १०० मीटरवर असतानाही वीर जवानांना थांबून श्रद्धांजली वाहण्यास वेळ नव्हता हे आश्चर्यजनक आहे, असे यादव म्हणाले. विमानतळावर जवानांचे मृतदेह आल्यावर तेथे नितीशकुमारांच्या कार्यालयातील कोणीही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल यादव यांनी नाराजी व्यक्त केली.