कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपवा, पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 04:56 AM2021-03-18T04:56:56+5:302021-03-18T07:18:47+5:30
कोरोनाच्या वाढत्या फैलावाबद्दल तसेच लसीकरण मोहिमेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
नवी दिल्ली : देशात येऊ घातलेली कोरोना साथीची दुसरी लाट थोपविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलायला हवीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावाबद्दल तसेच लसीकरण मोहिमेविषयी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुमारे ७० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात सुमारे दीडशेहून अधिक टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळीच थोपविले नाही तर ही साथ पूर्वीपेक्षा आणखी उग्र रूप धारण करू शकते. देश कोरोना संसर्गाशी मुकाबला करताना निष्काळजीपणा दाखवू नये. कोरोना साथीला रोखण्यासाठी राज्यांनी चाचण्यांची संख्या वाढवावी, प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना केले.