काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर थांबवा - विरोधक!

By admin | Published: August 10, 2016 03:57 AM2016-08-10T03:57:30+5:302016-08-10T03:57:30+5:30

काश्मिरातील परिस्थितीवर चर्चा घेण्याची मागणी राज्यसभेत विरोधी पक्षांनी एकजुटीने लावूून धरल्यानंतर सरकार चर्चेला तयार झाले.

Stop using pellet guns in Kashmir - opponent! | काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर थांबवा - विरोधक!

काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर थांबवा - विरोधक!

Next

नवी दिल्ली : काश्मिरातील परिस्थितीवर चर्चा घेण्याची मागणी राज्यसभेत विरोधी पक्षांनी एकजुटीने लावूून धरल्यानंतर सरकार चर्चेला तयार झाले. या मुद्यावर बुधवारी चर्चा होणार असून, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हा गुंतागुंतीचा मुद्दा सोडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य मागितले आहे. शून्य प्रहरात काँग्रेससह विविध पक्षांनी काश्मिरात महिनाभरापासून लागू असलेल्या संचारबंदीबाबत चिंता व्यक्त केली. खोऱ्यात पॅलेट गनचा वापर थांबविण्यात यावा, सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि संसदीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवावे आदी मागण्या विरोधी सदस्यांनी केल्या.
काश्मीर परिस्थितीवर आजच चर्चा घ्यावी, अशी विरोधी सदस्यांची मागणी होती, तर उद्या चर्चा घेणे सोईस्कर राहिल, असे सरकारचे मत होते. दोन्ही पक्षांत ओढाताण सुरू असताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या मुद्यावर बुधवारी सकाळी चर्चा घेण्याचा सल्ला दिला. गृहमंत्री सिंह यांनी तो मान्य केला. काश्मिरातील परिस्थिती गंभीर असल्याचे सिंह यांनी मान्य केले. काश्मीर या संवेदनशील राज्यात निर्माण झालेली समस्या केवळ सरकार सोडवू शकत नाही. यासाठी सरकारला सर्वांचे सहकार्य हवे आहे, असे ते म्हणाले.
काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व विरोधी पक्ष मदत करतील. सामान्य नागरिकांसह सुरक्षा जवांनही मृत्युमुखी पडले असून, आम्हाला दोघांच्याही मृत्यूचे दु:ख आहे. २००८ आणि २०१० च्या घटनांपासून आम्ही धडा घ्यायला हवा होता. भूतकाळात चुका झाल्या; परंतु आता त्याची पुनरावृत्ती होऊ नये. त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्यासह एक शिष्टमंडळ काश्मीरला पाठविण्याचा सल्ला दिला.
सरकारने काश्मीरबाबतची आपली व्यूहरचना सांगायला हवी, असे जदयुचे शरद यादव म्हणाले. त्यांनी पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली. माकपाचे सीताराम येचुरी यांनीही तीच मागणी केली. सपाचे रामगोपाल यादव म्हणाले की, खोरे जळत असल्याचे उभा देश पाहत असून, लोक आम्हाला आम्ही काय करतोय, असा प्रश्न विचारत आहेत.
आपण गृहमंत्र्यांशी बोललो असून, बुधवारी या मुद्यावर चर्चा घेतली जाऊ शकते, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. दीर्घ काळापासून संचारबंदी लागू असल्यामुळे परिस्थिती बिकट बनली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक सदस्यांनी सभागृहात आजच चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. त्यावर उपसभापती पी.जे. कुरियन म्हणाले की, मलाही या मुद्यावर चर्चा हवी आहे. मात्र, यासाठी गृहमंत्री सभागृहात उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यावर आझाद यांनी उद्या प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर रद्द करून सकाळी ११ वाजता या मुद्द्यावर चर्चा घेतली जाऊ शकते, असे सुचविले. यादरम्यान गृहमंत्री राजनाथसिंह सभागृहात आले आणि त्यांनी उद्या सकाळी चर्चा घेण्याचा सल्ला मान्य केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)


श्रीनगर : काश्मिरात सलग ३२ व्या दिवशी काही भागांत संचारबंदी आणि उर्वरित खोऱ्यात जमावबंदी लागूच आहे. तथापि, हुल्लडबाजांना दूर ठेवण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलासह आता लष्कर पुढे सरसावल्याने परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.
श्रीनगर शहरातील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तसेच दक्षिण काश्मिरातील अनंतनाग शहरात संचारबंदी आणि खोऱ्याच्या उर्वरित भागात जमावबंदी लागू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आज दगडफेकीच्या काही किरकोळ घटना घडल्या; परंतु कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आतापर्यंत काश्मिरात ५५ लोक ठार, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. संंचारबंदी आणि जमावबंदी तसेच फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे खोऱ्यात सलग ३२ व्या दिवशीही जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही.

जम्मू : खोऱ्यातील निदर्शनांदरम्यान सामान्य लोक मृत्युमुखी पडल्याची व्यापक चौकशी करण्याची घोषणा जम्मू आणि काश्मीर
सरकारने मंगळवारी केली. राज्याचे मंत्री
आणि पीडीपीचे ज्येष्ठ नेते जुल्फिकार अली म्हणाले की, परिस्थिती निवळताच सरकार सामान्यी चौकशी करणार असून, दोषींविरुद्ध कारवाई होईल.
आम्ही एकाही दोषीला सोडणार नाही. खोऱ्यातील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले. हिंसक निदर्शनांबाबत बोलताना त्यांनी सर्वांना विशेष करून राज्यातील युवकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, पालकांनीही आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Stop using pellet guns in Kashmir - opponent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.