मुस्लिमांविरोधातील हिंसाचार थांबवा; १०८ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 06:59 AM2022-04-28T06:59:11+5:302022-04-28T06:59:28+5:30
भाजपशासित राज्यांतील हिंसाचारामुळे फक्त मुस्लिम नव्हे तर, राज्यघटनेचीही होरपळ होत आहे
नवी दिल्ली : भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिमांच्या विरोधात हिंसाचार सुरू असून, ती स्थिती चिंताजनक आहे. हा हिंसाचार संपुष्टात आणावा, अशी मागणी १०८ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका खुल्या पत्रात केली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये ज्युलिओ रिबेरो, मीरा बोरवणकर, रवी बुद्धिराजा, व्ही. पी. राजा आदी मान्यवरांचा समावेश आहे.
या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोदी यांना लिहिलेल्या तीन पानी पत्रात म्हटले आहे की, भाजपशासित राज्यांतील हिंसाचारामुळे फक्त मुस्लिम नव्हे तर, राज्यघटनेचीही होरपळ होत आहे. राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला धक्का लावण्याचे प्रयत्न होत आहेत. ही घटना आपल्या देशातील दिग्गजांनी तयार केली आहे. तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र त्याच्या विपरीत स्थिती निर्माण झाली असून, त्याबद्दल आवाज उठविणे आवश्यक आहे. आम्ही माजी सनदी अधिकारी आहोत. त्यामुळे सातत्याने मतप्रदर्शन करत नाही. राज्यघटनेला धक्का लावण्याचे प्रयत्न होत असतील तर त्याबद्दल बोलणे आवश्यक आहे.
विविधतेतील एकतेला धोका
या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत आणि महिन्यांमध्ये आसाम, दिल्ली, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये मुस्लिम समाजाविरोधात हिंसक घटना घडत आहेत.