बंगाल, दिल्लीला वादळाचा तडाखा; आठ ठार, २२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 05:10 AM2018-05-17T05:10:18+5:302018-05-17T05:10:18+5:30
प. बंगालमध्ये आलेल्या वादळानंतर विजा कोसळून सात जण ठार झाले तर ९ जण जखमी झाले. धुळीच्या वादळाने दिल्लीला दिलेल्या तडाख्यात अठरा वर्षांचा एक युवक ठार झाला आणि तेरा जण जखमी झाले.
नवी दिल्ली/कोलकाता : प. बंगालमध्ये आलेल्या वादळानंतर विजा कोसळून सात जण ठार झाले तर ९ जण जखमी झाले. धुळीच्या वादळाने दिल्लीला दिलेल्या तडाख्यात अठरा वर्षांचा एक युवक ठार झाला आणि तेरा जण जखमी झाले. याशिवाय वादळामुळे असंख्य झाडे जमीनदोस्त झाली आणि विजेचे खांबही कोसळले.
द्वारका भागात धुळीच्या वादळामुळे एका घराची भिंत कोसळून झोपलेला युवक ठार झाला. या कुटुंबातील चार जणही जखमी झाले. या वादळामुळे दिल्ली परिसरात अनेक झाडे पडली असून ती रस्त्यातून हटविण्यात आली. त्यामुळे सकाळी रहदारीची वेळ सुरू होईपर्यंत वाहतुकीतील अडथळा दूर झाला.
रविवारपासून पाच राज्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे व विजा
कोसळून ८० जण ठार झाले आहेत. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये ५१ जणांचा बळी गेला आहे.
>बंगालमध्ये बुधवारी सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे नादिया, उत्तर २४ परगणास, बाणकुरा आदी जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले.
येत्या काही दिवसांत पूर्व व दक्षिण भारत व हिमालयाच्या कुशीतील काही राज्यांना वादळीवाºयाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.