वादळ आज धडकणार, बिपोरजॉयमुळे गुजरातमध्ये ५० हजार लोकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 06:34 AM2023-06-15T06:34:06+5:302023-06-15T06:34:31+5:30

मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या ३३ टीम

Storm to hit today, 50,000 people displaced in Gujarat due to Biporjoy | वादळ आज धडकणार, बिपोरजॉयमुळे गुजरातमध्ये ५० हजार लोकांचे स्थलांतर

वादळ आज धडकणार, बिपोरजॉयमुळे गुजरातमध्ये ५० हजार लोकांचे स्थलांतर

googlenewsNext

मांडवी / अहमदाबाद: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराजवळ शक्तिशाली चक्रीवादळ बिपोरजॉयच्या संभाव्य आगमनापूर्वी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत राज्याच्या किनारपट्टी भागातील सुमारे ५० हजार लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात स्थलांतरित केले आहे.

भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले की, बिपोरजॉय गुजरात किनारपट्टीकडे सरकल्याने सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बिपोरजॉय मार्ग बदलून ईशान्य दिशेने कच्छ आणि सौराष्ट्रकडे सरकणार आहे आणि गुरुवारी संध्याकाळी जखाऊ बंदराजवळ धडक देईल, असा अंदाजही आयएमडीने व्यक्त केला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी तिन्ही दलांच्या सैन्यप्रमुखांशी चर्चा केली. राजनाथ सिंह म्हणाले की, चक्रीवादळामुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सशस्त्र दल सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. लष्कर, नौदल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेत.

मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या ३३ टीम

गुजरात आणि महाराष्ट्रात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफने ३३ टीम तयार ठेवल्या आहेत. १८ तुकड्या गुजरातमध्ये आणि एक टीम दीवमध्ये ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रात १४ तुकड्या असणार आहेत. यातील ५ मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत. उर्वरित तुकड्याही सज्ज राहणार आहेत. गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ प्रदेशात चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आठ जिल्हे आणि सखल भागातील ४४२ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.

वेगवान वारे वाहणार...

  • जामनगर, जुनागड, राजकोट, पोरबंदर आणि कच्छ जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांमध्ये या कालावधीत ५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांच्या कालावधीत सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यातील ५४ तालुक्यांमध्ये १० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला.
  • राज्याचे मदत विभागाचे आयुक्त आलोक कुमार पांडे म्हणाले, चक्रीवादळ आता कच्छपासून सुमारे २९० किमी अंतरावर आहे. कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यात हे वारे हळूहळू १२५ ते १३५ किमी प्रतितास वेगाने वाहतील, असा अंदाज आहे.
  • गुरुवारी संध्याकाळी समुद्राची स्थिती खूपच खराब होण्याची शक्यता आहे.
  • कच्छ जिल्ह्यात ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप


बिपोरजॉय किनारपट्टीकडे सरकत असताना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. कच्छ जिल्ह्यातील भचाऊपासून ५ किमी पश्चिम दक्षिण पश्चिम भागात सायंकाळी ५.५५ वाजता हे धक्के जाणवले.

चक्रीवादळ 'बिपोरजॉय' पाकिस्तानात पोहोचण्याच्या शक्यतेमुळे किनारपट्टीवरील शहरे आणि लहान बेटांवर राहणाऱ्या हजारो लोकांनी आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

Web Title: Storm to hit today, 50,000 people displaced in Gujarat due to Biporjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.