'ऑपरेशन ट्रायडंट' : भारतीय नौदलाने असा उडवला होता पाकिस्तानच्या कराची बंदराचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 11:48 AM2018-12-04T11:48:18+5:302018-12-04T11:51:02+5:30
1971 च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या कराचीचा धुव्वा उडवला होता
मुंबई - भारताच्या सागरी सुरक्षेमध्ये नौदलाचे योगदान महत्त्वपूर्ण असे आहे. भारतीय नौदलाच्या योगदानाची आठवण म्हणून 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतीय नौदलाने गाजवलेल्या पराक्रमाचे प्रतीक आहे. 1971 साली झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान, याच दिवशी भारतीय नौदलानेपाकिस्तानमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या कराचीचा धुव्वा उडवला होता.
1971 च्या युद्धात भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमामुळे पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाला होता. मात्र आतापर्यंतच्या युद्धांपैकी 1971च्या युद्धातील भारतीय नौदलाचा पराक्रम हा उल्लेखनीय असा आहे. एकीकडे हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानी सैन्याला थोपवण्याचे काम केले. तर दुसरीकडे नौदलाने समुद्री सीमा बंद करून पश्चिम पाकिस्तानमधून पूर्व पाकिस्तानला होणारी रसद तोडली.
'ऑपरेशन ट्रायडंट' नावाने मोहीम हाती घेत नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले. भारतीय नौदलाने एका रात्रीत पाकिस्तानची तीन जहाजे उदध्वस्त केली. तसेच क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर हल्ला केला. कराची बंदराचे सामरिक महत्त्व विचारात घेऊन भारतीय या बंदरावर हल्ला चढवला. येथे पाकिस्तानी नौदलाचे मुख्यालय आणि पाकिस्तानचा तेलसाठाही होता.
या मोहिमेचे नेतृत्व अॅडमिरल सरदारीलाल मथरादास नंदा करत होते. तर या मोहिमेची आखणी गुलाब मोहनलाल हिरानंदानी यांनी केली होती. भारतीय नौदलाने अनेक आव्हानांचा सामना करत ही मोहीम पूर्ण केली. एकीकडे भारतीय नौदलाकडे असलेल्या रडारची रेंज मर्यादित होती. तसेच इंधन क्षमताही कमी होती. मात्र नौदलाच्या अधिकाऱ्यांनी साहसाचे प्रदर्शन करत क्षेपणास्त्रे बसवण्यात आलेल्या युद्धनौका कराचीच्या अगदी जवळ नेऊन संपूर्ण शक्तिनिशी हल्ला केला. त्यानंतर काही वेळातच कराची बंदर आगीच्या ज्वाळांनी पेटले. तसेच तेल भांडारालाही आग लागली. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी नौदलाचे मनौधैर्य खच्ची झाले.
कराची बंदराची धुळधाण उडवल्यानंतर भारतीय नौदलाने अजून एक पराक्रम गाजवला. पाकिस्तानी नौदलाकडे असलेली तेव्हाच्या काळातील बलाढ्य़ पाणबुडी पीएनएस गाझी नौदलाने बुडवली. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाचे सामर्थ्य अधिकच खच्ची झाले.