एका हरवलेल्या मुलाची गोष्ट

By admin | Published: February 7, 2017 12:22 PM2017-02-07T12:22:24+5:302017-02-07T12:52:46+5:30

आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने...

The story of a lost son | एका हरवलेल्या मुलाची गोष्ट

एका हरवलेल्या मुलाची गोष्ट

Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 7 - आई हरवलेल्या मुलाला शोधण्यासाठी मंदिर-दर्गा सर्वत्र नवस करत होती. एक दिवस समजलं की 20 दिवसांपासून तिच्या घरी भाडेकरू म्हणून राहणाराच तिचा मुलगा राजू आहे. आई-आणि मुलाची ही घटना फिल्मी आहे पण सत्य आहे. 
 
बिहारच्या  बेगुसराय जिल्ह्यातील फुलबडिया येथील शबाना परवीन यांचा मुलगा 2009 मध्ये हरवला होता. गावातील एका मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमाला तो गेला असता तेथून अचानक गायब झाला. खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही अखेर फुलबडिया पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती. मुलगा भेटावा यासाठी त्याच्या आईने अजमेरपासून मुंबईच्या हाजीअली दर्ग्यापर्यंत नवस मागितला, पण तो काही भेटला नाही. हरवल्याच्या 7 वर्षानंतर जानेवारी 2017मध्ये आईला राजू स्वतःच्याच घरात भेटला. 
 
परवीन यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणा-या एका रिक्षावाल्याला बरौनी येथे राजू भटकताना दिसला आणि राजूने काही काम देण्याची त्याला विनंती केली.  त्यावेळी राजू हा परवीन यांचा हरवलेला मुलगा आहे हे त्या रिक्षावाल्याला माहित नव्हतं.  तो रिक्षावाला त्याला आपल्याबरोबर घरी घेऊन आला आणि ते सोबत राहायला लागले.   एक दिवस अचानक परवीन यांनी राजूला पाहिलं आणि बघता क्षणीच त्यांनी  राजूला ओळखलं. मात्र, राजू आपल्या आईला ओळखू  शकला नाही. परवीन यांनी त्याला लहानपणीचा फोटो अल्बम दाखवला त्यानंतर त्याने आपल्या आईला ओळखलं.  
 
जावळाच्या कार्यक्रमातून काही लोकांनी राजूला बळजबरीने उचलून नेलं. इन्जेक्शन आणि औषधं देऊन त्याला एका  ठिकाणी ठेवण्यात आलं. अपहरण करणारा एक व्यक्ती त्याला तू माझा मुलगा आहे असं सांगायचा. कालांतराने राजू सर्वकाही विसरला आणि अपहरण करणा-या दांम्पत्यालाच आपले आई-वडिल मानायला लागला. चार वर्षांनंतर बाहेर खेळताना त्याच्या एका मित्राने त्याला सांगितलं की त्याचे आई-वडिल खोटं बोलत आहेत आणि त्याचं अपहरण करण्यात आलं आहे. हे कळल्यानंतर राजूने तेथून पळ काढला. आपलं घर रेल्वे स्थानकाच्या जवळ आहे इतकंच त्याला आठवत होतं. घर शोधण्यासाठी त्याने वाराणसी , अलाहाबाद, भटनी, देवरियासह अनेक स्थानकांवर त्याने रात्र घालवली पण घर सापडलं नाही.    
 
भूक शमवण्यासाठी तो कोणत्याही हॉटेल किंवा चहाच्या दुकानात काम करायचा आणि काही दिवस काम केल्यानंतर पुन्हा घराच्या शोधात निघायचा . एक दिवस तो बरौनी येथे पोहोचला आणि अरमान या रिक्षावाल्याला भेटला. त्याच्यासोबतच राजू स्वतःच्याच आईच्या घरात राहायला लागला. मात्र घरामध्ये आणि परिसरामध्ये बरेच बदल झाले होते त्यामुळे हे आपलंच घर आहे हे त्याला समजत नव्हतं. 
 
पोलीस अधीक्षक रंजीत कुमार मिश्र यांनी 2009 मध्ये बेपत्ता झालेला राजू सापडला असल्याचं सांगितलं. आता राजूला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.   

Web Title: The story of a lost son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.