अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 10:40 AM2024-05-07T10:40:26+5:302024-05-07T10:41:35+5:30
Social Viral: मे महिन्याच्या सुरुवातीला शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. त्यामुळे मुलांसोबतच पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता असते. मात्र गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचं प्रगती पुस्तक समोर आलं तेव्हा त्यामधील गुण पाहून तिला धक्काच बसला.
मे महिन्याच्या सुरुवातीला शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. त्यामुळे मुलांसोबतच पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता असते. मात्र गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचं प्रगती पुस्तक समोर आलं तेव्हा त्यामधील गुण पाहून तिला धक्काच बसला. इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीला दोन विषयांमध्ये कमाल गुणांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. शाळेकडून झालेल्या या चुकीमुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आता हे प्रगती पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
चौथीत शिकणारी विद्यार्थिनी वंशीबेन मनीषभाई हिला शाळेकडून जेव्हा मार्कशीट मिळाली. तेव्हा दोन विषयातील गुण पाहून तिला धक्काच बसला. कारण तिला दोन विषयांमध्ये कमाल गुणांपेक्षा अधिक गुण मिळाले होते. वंशीबेन हिला गुजरातीमध्ये २०० पैकी २११ आणि गणितामध्ये २०० पैकी २१२ गुण मिळाल्याची नोंद प्रगती पुस्तकावर करण्यात आली होती.
जेव्हा ह्या विद्यार्थिनीने प्रगती पुस्तक घरी दाखवलं तेव्हा शाळेकडून झालेली चूक समोर आली. त्यानंतर याची विचारणा शाळेकडे करण्यात आली. मग निकाल तयार करताना झालेल्या एका चुकीमुळे ही चुकीची नोंद केली गेली, अशी माहिती समोर आली. त्यानंतर प्रगती पुस्तकामध्ये गुजरातीमध्ये १९१ आणि गणितामध्ये २०० पैकी १९० गुण अशी सुधारित नोंद करण्यात आली. मात्र इतर विषयांमधील गुण हे योग्य असल्याने त्यात बदल झाला नाही. अखेरीस सुधारित निकालामध्ये वंशिबेन हिला १ हजार गुणांपैकी ९३४ गुण मिळाले. दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी या चुकीचं कारण निश्चित करून भविष्यात अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी तपास सुरू केला आहे.