आपच्या माजी मंत्र्याला भाजपने पक्षात घेतले, तीन तासांत बाहेरही काढले; हरियाणात असे काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 12:15 PM2024-08-11T12:15:50+5:302024-08-11T12:16:27+5:30
२०१६ चे प्रकरण, भाजप असे कसे विसरले? केजरीवालांनी याच प्रकरणात मंत्रिपदावरून, पक्षातून काढलेले...
विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि आपल्या पक्षात घ्यायचे ही भाजपची वॉशिंग मशीन असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत आले आहेत. परंतू आता आपच्या माजी मंत्र्याला पक्षात घेऊन पुढच्या तीन तासांत काढूनही टाकल्याचा प्रकार भाजपात घडला आहे. एक जुने प्रकरण विरोधकांनी उकरून काढल्याने ही हकालपट्टी करण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाचे दिल्लीचे माजी मंत्री संदीप वाल्मिकी हे शनिवारी भाजपात दाखल झाले होते. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी त्यांना पक्ष प्रवेश दिला होता. पंचकुलामध्ये हा कार्यक्रम झाला. त्यानंतर तीन तासांतच भाजपाने पत्रक काढून वाल्मिकींना पक्षातून काढल्याचे जाहीर केले.
सैनी यांनी वाल्मिकी यांना पक्ष प्रवेश देतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर वाल्मिकी यांच्याबाबत जुन्या बातम्या शेअर केल्या जाऊ लागल्या. याची माहिती मिळताच निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने रिस्क न घेता वाल्मिकी यांना काढून टाकले. संदीप वाल्मिकी यांनी त्यांच्यावर असलेले गंभीर आरोप पक्षापासून लपविले आणि पक्षाला अंधारात ठेवले. यामुळे आम्ही त्यांना काढून टाकत आहोत, असे भाजपाने म्हटले आहे.
भाजपात प्रवेश देताना सैनी यांनी वाल्मिकी यांना आपमध्ये मेहनत घेऊनही मान सन्मान मिळत नसल्याने दु:खी असल्याचे म्हटले होते. तसेच केजरीवाल यांनी ज्याला गुरु मानले त्यालाच धोका दिल्याचा आरोप केला होता. यानंतर काही तासांत भाजपला वाल्मिकी यांना का मान सन्मान दिला जात नाही, हे समजले आहे.
आपमध्ये काय घडलेले...
वाल्मिकी हे दिल्ली सरकारमध्ये केजरीवालांचे मंत्री होते. त्यांच्याकडे महिला व बाल विकास मंत्रालय देण्यात आले होते. २०१६ मध्ये रेशन कार्ड बनविण्याच्या एका प्रकरणात एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर केजरीवाल यांनी त्यांना मंत्रिपदावरून हटविले होते, तसेच पक्षातून काढून टाकले होते. वाल्मीकी यांची अश्लिल सीडी समोर आली होती.