देशात मंदी असती तर कोट-जॅकेटऐवजी धोतरावर फिरलो असतो; भाजप खासदाराचा अजब तर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:32 AM2020-02-10T10:32:29+5:302020-02-10T10:33:54+5:30
विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी नसून तेजी असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेकदा सांगितले आहे. आता त्यांच्या पक्षाच्या खासदाराने देखील देशात मंदी नसल्याचे सांगत अजब तर्क मांडला आहे.
उत्तर प्रदेशातील बलिया मतदार संघाचे खासदार विरेंद्र सिंह यांच्यानुसार देशात मंदी नाही. देशातील नागरिक पारंपरिक धोतर-कुर्ता परिधान करण्याऐवजी कोट आणि जॅकेट परिधान करत आहेत. मग मंदी कसकाय, असा अजब सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीसह संपूर्ण जगात मंदीवर चर्चा होत असून यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
जगभरात मंदीवर चर्चा होते. परंतु, मंदी असती तर देशात कोट आणि जॅकेटऐवजी लोकांनी धोतर-कुर्ता परिधान केले असते. मंदीत आपण कपडे खरेदी केले नसते. पँट आणि पायजामा खरेदी केला नसता असे सांगत त्यांनी भारत केवळ शहरांचा नव्हे तर खेड्यापाड्यांचा देश असल्याचे नमूद केले. देशात 6.5 लाख गावं आहेत. महत्मा गांधी, डॉक्टर हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जयप्रकाश नारायण यांनी देखील ग्रामीण भागावर विश्वास दाखवला होता, याची आठवण विरेंद्र सिंह यांनी करून दिली.
दरम्यान विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.