संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी रणनीती; पंतप्रधान मोदींची अमित शाह, जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:42 AM2023-09-03T07:42:51+5:302023-09-03T07:42:59+5:30
सर्व राज्यांमध्ये भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर निवडणूक लढविणार आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमवेत चर्चा करून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी दोन्ही नेत्यांसमवेत १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा व एक देश, एक निवडणूक यावरही चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आपल्या निवासस्थानी बोलावून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोरामच्या निवडणुकांसाठी भाजपच्या तयारीचा आढावा घेतला.भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, सर्व राज्यांमध्ये भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर निवडणूक लढविणार आहे. भाजपला सर्वांत जास्त अडचणींना राजस्थानमध्ये सामोरे जावे लागत आहे. तेथे वसुंधरा राजे यांच्याबाबत मोठा धोरणात्मक निर्णय भाजपला घ्यायचा आहे.
कोणत्या राज्यात कशी स्थिती ?
- सूत्रांनी सांगितले की, भाजपने वसुंधरा राजेंबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. भाजप राजस्थानमध्ये सामूहिक नेतृत्वातच यावेळी निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत नंतर निर्णय होणार आहे. वसुंधरा राजे यांना यावेळी भाजप राजस्थान निवडणूक मोहिमेत मोठी जबाबदारी देऊ करणार आहे.
- मध्य प्रदेशातही मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाणार नाही. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना जास्त महत्त्व दिले जात आहे.
- अशाच प्रकारे छत्तीसगढमध्येही भाजप नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले रमणसिंह यांनाही निवडणूक मोहिमेत मागे टाकण्यात आले आहे.
- तेलंगणात भाजप बीआरएसविरोधात जास्त आक्रमक दिसत नाही. बीआरएसनेही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीपासून अंतर राखलेले आहे.