रणनिती शहा! विरोधकांवर प्रखर हल्लाबोल, सहयोगी दलाशी घेतले नमते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 07:16 AM2019-05-25T07:16:26+5:302019-05-25T07:17:32+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अमित शहा हेच भाजपचे खरे सूत्रधार राहिले आहेत.
विकास झाडे / सुरेश भुसारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रत्येक राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यावर हल्लाबोल करून विरोधकाला नामोहरम करण्याची आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यापुढे नमते घेण्याची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची योजना यशस्वी झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अमित शहा हेच भाजपचे खरे सूत्रधार राहिले आहेत.
शरद पवार लक्ष्य
महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ही एक शक्ती आहे. या शक्तीला तडे दिल्यास भाजपचा मार्ग मोकळा होईल, हे स्पष्ट होते. यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या परिवारावर प्रचाराचा फोकस केला होता. याचे परिणाम दिसून आले आहे.
शिवसेनेसाठी शांतीदूत
एका टप्प्यावर शिवसेनेसोबत कटुता निर्माण झाल्यानंतर सेना-भाजप युती व्हावी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचे रणनितीकार आणि जदयुचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांना चर्चेला पाठविले. ही चर्चाच दोन्ही पक्षात युती होण्याचे फलित ठरले. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेक चर्चा झाल्या. मतदानाच्या सातव्या फेरीनंतर अमित शहा यांनी एनडीएच्या सदस्यांसाठी स्नेहभोजन ठेवले होेते त्यात ठाकरे यांना सन्मानाची वागणूक मिळाली.
ममतांवर आघात
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टोकाचा हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा या दोन्ही नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेचा फोकस ठेवला होता. याचा परिणाम भाजपला दुसऱ्या क्रमाकांच्या जागा मिळण्यात झाला.
सपा-बसपावर टीकास्त्र
उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसची फारशी शक्ती नसल्याने सपा व बसपाच्या व्होट बँकेवर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली. याचा परिणाम उत्तरप्रदेशातही भाजपला ५८ जागा मिळविण्यात भाजपला यश आले आहे.
सहयोगी दलाला महत्व!
निवडणुकीच्या काळात अमित शहा यांनी सहयोगी दलाला दिलेले महत्व हे भाजप व एनडीएच्या जागा वाढविण्यास महत्वाचे ठरले. बिहारमध्ये भाजपने १७ जागा लढविल्यात. जदयुकडे १७ तर रामविलास पासवान यांना ६ जागा दिल्यात. जेवढेही सहयोगी पक्ष होते त्यांचे उमेदवार हे ‘भाजपचेच उमेदवार आहेत’ ही भूमिका ठेवून शहा हे स्वत: राबलेत आणि कार्यकर्त्यांची फळी सहयोगी पक्षाच्या उमेदवारामागे लावली. यातूनच त्यांना २०१९चे घवघवीत यश मिळाले आहे.