खळबळजनक! श्वानांची दहशत; चिमुकलीला 150 मीटर फरफटत नेलं, जीवघेणा हल्ला केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 01:01 PM2024-02-26T13:01:28+5:302024-02-26T13:02:09+5:30
श्वानांनी दोन वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला आणि तिला 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.
देशाची राजधानी दिल्लीत भटक्या श्वानांची दहशत पाहायला मिळत आहे.तुघलक लेनच्या धोबीघाट परिसरात भटक्या श्वानांनी दोन वर्षांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला आणि तिला 150 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी तिच्या घराबाहेर बसली होती तेव्हा चार ते पाच कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला, तिला कित्येक मीटरपर्यंत फरफटत नेलं आणि तिचे लचके तोडले. मृतदेह मुलीच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचं पोलिसांचे म्हटलं आहे.
नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (NDMC) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. पशुवैद्यकांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता परिसरात कुत्र्यांचे लसीकरण व नसबंदी करण्यात येत असल्याचं आढळून आलं. पोलीस तपासातच अधिक गोष्टी स्पष्ट होतील.
या परिसरात काही लोक भटक्या कुत्र्यांना खायला घालत असल्याचा दावा मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मुलीचे काका रवी म्हणाले, संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी आमच्या मुलीवर अचानक हल्ला केला, तिला 100-150 मीटरपर्यंत ओढून जखमी केले. या परिसरात भटक्या कुत्र्यांचा हा पहिला हल्ला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
रवी म्हणाले की, या कुत्र्यांनी घराबाहेर खेळणारी इतर मुलं, मांजर आणि कोंबड्यांवर हल्ला केला. याबाबत स्थानिकांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ते म्हणाले. स्थानिक लोकांनी काही लोकांबाबत पोलिसांकडे तक्रारही केली होती, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा रवीने केला आहे.