‘जिथे श्वास घेणे कठीण तिथे पराक्रम गाजवताय’; लेहमध्ये त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:59 AM2023-09-04T06:59:17+5:302023-09-04T06:59:30+5:30
संग्रहालयाच्या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे.
मुंबई : त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक आहे. जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्ही पराक्रम गाजवताय. आम्ही तुमच्या शौर्याला सलाम करतो, अशा शब्दांत भारतीय लष्कराच्या त्रिशूळ डिव्हिजनच्या शौर्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले. लेहमधील कारू येथे त्रिशूळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे ३ कोटी खर्च करून हे संग्रहालय उभारण्यात येत असून, यासाठीचा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे.
संग्रहालयाच्या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे. या संग्रहालयासाठी निधी लागला तर तो दिला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी भूमिपूजनावेळी दिले. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी एनएसजी तुकडीचे नेतृत्व करणारे कर्नल सुनील शेओरान यांचीही भेट घेतली. कर्नल शेओरान यांचा उल्लेख बुलेट कॅचर असा केला. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल व महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल, असेही फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल लेफ्ट. जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी.के. मिश्रा यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.
संकल्पना महाराष्ट्रातील महिलांची
सुमारे वर्षभरापूर्वी त्रिशूळ युद्ध संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. महाराष्ट्रातील ॲड. मीनल भोसले आणि सारिका मल्होत्रा या दोन महिलांनी या भागात भेट दिली, तेव्हा या संकल्पनेचा उदय झाला. संग्रहालय त्रिशुळाच्या आकाराप्रमाणे असणार आहे. यात तीन प्रदर्शन कक्ष असतील.