सावरकरांच्या ‘त्या’ फलकाला काळे फासले; जेएनयूत तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:08 AM2020-03-18T05:08:58+5:302020-03-18T05:09:35+5:30

एका रस्त्याला सावरकरांचे नाव दिल्यानंतर डाव्या संघटनांनी त्याचा निषेध केला होता.

Stress in JNU | सावरकरांच्या ‘त्या’ फलकाला काळे फासले; जेएनयूत तणाव

सावरकरांच्या ‘त्या’ फलकाला काळे फासले; जेएनयूत तणाव

googlenewsNext

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका रस्त्याला रविवारी रात्री वि. दा. सावरकर मार्ग असे नाव दिल्यानंतर ‘त्या’ फलकाला अज्ञातांनी काळे फासले. त्यामुळे विद्यापीठात तणाव असून, अभाविपने जेएनयू विद्यार्थी संघावर आरोप करून, त्यांची प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. प्राध्यापक संघटनेनेही अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एका रस्त्याला सावरकरांचे नाव दिल्यानंतर डाव्या संघटनांनी त्याचा निषेध केला होता. सोमवारी रात्री या फलकावरील सावरकरांचे नाव मिटवून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लिहिण्यात आले. त्यानंतर त्याला ‘मोहम्मद अली जिना मार्ग’ असे भित्तीचित्र लावण्यात आले. आता या फलकावर डॉ. आंबेडकर यांचे नाव आहे.
या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडे व पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे अभाविपचे सचिव गोविंद डांगी यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विद्यापीठ प्रशासनाने या मार्गाला सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. रस्त्याला सावरकरांचे नाव दिल्याचे कळताच जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयेशी घोष यांनी प्रशासनावर टीका केली.

टिष्ट्वटरवरून आरोप प्रत्यारोप : आयेशी घोष यांनी या फलकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्याचे फेसबुकवरून सांगितले. त्यानंतर एनएसयूआयने सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्यात कोणतेही योगदान नसून ते ब्रिटिश सरकारचे मध्यस्थ होते, असे टिष्ट्वट केले. अभाविपने डाव्यांनीच फलकाचे मोहम्मद अली जिना मार्ग असे नामकरण केल्याचा आरोप टिष्ट्वटरवरून केला आहे.

Web Title: Stress in JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.