अतिरेक्यांविरुद्ध कडक कारवाई, काश्मिरात राज्यपाल राजवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:37 AM2018-06-21T06:37:58+5:302018-06-21T06:37:58+5:30
भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली.
नवी दिल्ली/श्रीनगर : भाजपने पाठिंबा काढून काढल्यानंतर मेहबुबा मुफ्ती सरकारने राजीनामा दिल्याने जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी राज्यपाल राजवट लागू केली. तेथील शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा जिल्ह्यांत दहशतवाद्यांच्या विरोधात अत्यंत कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी पाठविलेल्या अहवालाच्या आधारे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली. ती लागू होताच, एन. एन. व्होरा यांनी मुख्य सचिव बी. बी. व्यास यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आता जोरात कारवाई सुरू होईल, असे पोलीसप्रमुख ए. पी. वैद यांनी सांगितले. लष्करप्रमुख बिपिनकुमार रावत म्हणाले की सरकारमधील बदलाचा फरक पडत नाही. आम्ही आमचे काम करीत राहू. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की आता आम्ही दहशतवादच संपवून टाकू.
सुब्रमण्यम नवे मुख्य सचिव
छत्तीसगढ केडरचे ज्येष्ठ आयएएस अधिकारी बी. व्ही. एस. सुब्रमण्यम यांची काश्मीरचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक झाली आहे. बी. व्ही. व्यास यांची ते जागा घेतील. माजी पंतप्रधन डॉ. मनमोहन सिंग यांचे ते स्वीय सचिव होते.
१४४ दहशतवादी सक्रिय
शोपियान, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा या जिल्ह्यांत सध्या १४४ दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी १३१ स्थानिक व १३
विदेशी आहेत. सन २०१७ साली १०९ नवीन दहशतवाद्यांची तयार झाले आणि चकमकीत १४४ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)