बांग्लादेशी अन् रोहिंग्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अमित शाहांचे पोलिसांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:10 IST2025-02-28T19:10:17+5:302025-02-28T19:10:43+5:30
निकृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस स्टेशन आणि उपविभागांवरही कठोर कारवाईचे निर्देश अमित शाहांनी यावेळी दिले.

बांग्लादेशी अन् रोहिंग्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; अमित शाहांचे पोलिसांना निर्देश
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अवैध बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसण्यास मदत करणाऱ्या नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले. खरं तर, अमित दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गृहमंत्री आशिष सूद, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
यादरम्यान अमित शाहांनी निकृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस स्टेशन आणि उपविभागांवरही कठोर कारवाईचे निर्देश दिले. शहरातील आंतरराज्य टोळ्यांचा निर्दयपणे नायनाट करणे, हे दिल्ली पोलिसांचे प्राधान्य असले पाहिजे. अंमली पदार्थांच्या बाबतीत कठोर कारवाई करावी आणि हे नेटवर्क मुळापासून संपवावे, असेही शाहांनी या बैठकीत सांगितले. बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशात घुसण्यास मदत करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कवर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांची ओळख पटवून त्यांना हद्दपार करावे, असे शाहांनी स्पष्टपणे सांगितले.
दिल्लीतील बांधकामाशी संबंधित प्रकरणांमध्ये दिल्ली पोलिसांच्या परवानगीची गरज भासणार नाही, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले. 2020 च्या दिल्ली दंगलीच्या खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी दिल्ली सरकारने विशेष अभियोजकांची नियुक्ती करावी, जेणेकरुन ही प्रकरणे लवकर निकाली काढता येतील. दिल्ली पोलिसांनी लवकरच अतिरिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी. डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन स्तरावर जाऊन जनसुनावणी शिबिरे आयोजित करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी निर्देश दिले.