धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई
By Admin | Published: October 8, 2015 04:54 AM2015-10-08T04:54:51+5:302015-10-08T04:54:51+5:30
उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम नागरिकाच्या हत्येचे तीव्र पडसाद उमटले असतानाच देशातील सांप्रदायिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम नागरिकाच्या हत्येचे तीव्र पडसाद उमटले असतानाच देशातील सांप्रदायिक सलोखा बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी बुधवारी दिला.
दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही दादरीकांडात प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या आपल्या नेत्यांवर लगाम कसताना या मुद्यावर राजकारण करण्याऐवजी एकोपा कसा कायम राहील याकडे लक्ष द्या, अशी ताकीद दिली आहे. राजनाथसिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकार असो वा केंद्र, देशाच्या सांप्रदायिक सद्भावाला तडा देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शासन केले जाईल. गोमांस साठवून खाल्ल्याची अफवा पसरल्यानंतर गेल्या सोमवारी बिसहडा गावातील इखलाक नामक व्यक्तीची जमावाने हत्या केली होती.
भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षश्रेष्ठींनी उत्तर प्रदेशातील फायरब्रॅण्ड नेते योगी आदित्यनाथ, संगीत सोम, साक्षी महाराज आणि केंद्रीय मंत्रिद्वय महेश शर्मा व संजीव बलियान यांनी दादरीप्रकरणी केलेल्या वक्तव्यांवर नाराजी जाहीर केली असून भविष्यात आपल्या वाणीवर ताबा ठेवण्याची ताकीद दिली आहे.
साध्वी प्राचींना रोखले
विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी प्राची यांनी बुधवारी बिसहडा गावात जाण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रशासनाने त्यांना गावाबाहेरच रोखले. यावर नाराजी व्यक्त करताना हा कट असल्याचे सांगून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना अशाच पद्धतीने का रोखण्यात आले नाही? असा सवाल त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)