१० टक्के पॉझिटिव्हिटी दर असलेल्या भागांत कडकडीत लॉकडाऊनची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:56 AM2021-05-05T05:56:19+5:302021-05-05T05:56:45+5:30
अन्यथा तिसरी लाट; 'एम्स'चे संचालक डॉ. गुलेरिया यांचा केंद्र सरकारला सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक किंवा रुग्णालयातील खाटा ६० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेल्या असतील, अशा भागांमध्ये कडक लॉकडाउन लावा, असा सल्ला 'एम्स'चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केंद्र सरकारला दिला.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याची त्रिसूत्रीही डॉ. गुलेरिया यांनी सांगितली. ते म्हणाले, ही साखळी तोडण्यासाठी आणि प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन उपयोगी नाहीत. किमान २ आठवड्यांसाठी कडकडीत लॉकडाऊन हवा. स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन लावणे आवश्यक आहे.
कोविड टास्क फोर्सनेही हीच सूचना दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख आहे. मात्र, त्यांची कडक अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल करावे. पॉझिटिव्हिटीचा दर जास्त असलेल्या भागांतून कमी दर असलेल्या परिसरात नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध लावले पाहिजे. - डॉ. रणदीप गुलेरिया
लॉकडाऊन देशव्यापी नकाे
n संपूर्ण देशव्यापी लॉकडाऊनबाबत ते म्हणाले, हा पर्याय असू शकत नाही. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.
n रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर जास्त परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी निश्चित कालावधीसाठी ठराविक भागासाठी कठोर निर्बंध लागू करायला हवे.
n सद्धाची रुग्णसंख्या हाताळण्याची क्षमता आरोग्य यंत्रणेमध्ये नाही.
डॉ. गुलेरियांनी सांगितली त्रिसूत्री
रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा.
कडक निर्बंध आणि आक्रमक कार्यपद्धतीद्वारे रुग्णसंख्या कमी करणे.
मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन व झटपट लसीकरण.