जीएसटी बुडविणाऱ्याविरुद्ध करणार कठोर उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 03:18 AM2020-01-03T03:18:59+5:302020-01-03T03:19:11+5:30
व्यावसायिकांनी केलेला करभरणा व प्रत्यक्ष वित्तीय व्यवहार यांची पडताळणी होणार
नवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाऱ्या तसेच या व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कठोर उपाययोजना केली जात असून, आता व्यावसायिकांनी केलेला करभरणा व प्रत्यक्ष वित्तीय व्यवहार यांची पडताळणी होणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांना बँक खात्यांचा तपशीलही जीएसटी प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे.
महसूल विभागाकडून लवकरच केंद्रीय व राज्य जीएसटी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. वित्तीय गुप्तचर शाखा आणि केंद्रीय थेट कर बोर्डाच्या अधिकाºयांचीही बैठक घेतली जाणार आहे. जीएसटी अनुपालनात सुधारणा व्हावी, यासाठी सरकारने याआधीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून २0 डिसेंबरपर्यंत जीएसटीआर-३ बी विवरणपत्रांचा भरणा १२ टक्क्यांनी वाढला आहे. ८१ लाख विवरणपत्रे या मुदतीत भरली गेली आहेत.
एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ई-वे बिल आणि फास्टॅग याद्वारे आम्ही माल खरोखरच हलविण्यात आला आहे का, याची तपासणी करू शकू. व्यवहार खरोखरच झाला आहे की, केवळ विवरणपत्रात बनावट नोंदी करण्यात आल्या आहेत, याची तपासणी करण्यात बँकांतील डाटाची मदत होईल.