मालवाहतूकदारांचं देशव्यापी चक्काजाम आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 09:18 AM2018-07-20T09:18:59+5:302018-07-20T09:27:04+5:30
संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी
मंबई - इंधन दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी आज देशभरातील मालवाहतूकदारांनी संप पुकारला आहे. या बेमुदत देशव्यापी संपात राज्यातील १३ लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने सहभागी होत असून, त्यात ट्रक, खासगी बसेस, टँकर व टेम्पो यांचा समावेश आहे. संपात राज्यातील १0 लाख ट्रकमालक सहभागी झाले आहेत. दीड लाख टेम्पोमालकही संपात सहभागी होत आहेत. या संपात स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनही सहभागी झाल्याने राज्यातील स्कूल बस व व्हॅन बंद राहणार आहेत.
टँकरमालकांनीही संपाला पाठिंबा दिल्याने दूध, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. राज्यातील १ लाखपैकी ३० टक्के टँकर्स तेल कंपन्यांकडे आहेत. ते संपात नसले तरी उर्वरित टँकर्सद्वारे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होणार नाही. संपकाळात वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहतील. संपात नसलेल्यांना पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. संपकाळात एसटी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बसेसचा वापर केला जाईल.
Mumbai: Students face inconvenience as All India Motor Transport Congress has started its protest all over Maharashtra against the constant increase in diesel prices, uncontrollable toll expenses, GST compliance issues, practical problems with e-way bills and some other issues pic.twitter.com/Ex1nqGilVd
— ANI (@ANI) July 20, 2018
स्कूल बसही सहभागी
स्कूल बस मालकांच्या संघटनेने गुरुवारी सायंकाळी या संपाला पाठिंबा जाहीर केला. यामुळे राज्यासह मुंबई आणि परिसरातील विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने बंद आहेत. त्यानुसार शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना घ्यायला स्कूल बस येणार नाहीत, याची पालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत सोडावे अशा सूचना शाळा आणि बस चालकांकडून पालकांना देण्यात आल्या आहेत.