काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक; प्रत्युत्तरात १२३ तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 06:45 AM2018-07-11T06:45:29+5:302018-07-11T06:45:42+5:30
काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार असून, दोन जवान जखमी झाले असून, यावेळी जवानांवर स्थानिकांनी दगडफेक केली.
श्रीनगर : काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार असून, दोन जवान जखमी झाले असून, यावेळी जवानांवर स्थानिकांनी दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात एक रहिवासी मरण पावला आणि १२३ जण जखमी झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी जखमी होण्याची
ही पहिलीच वेळ आहे.
कुंडलां येथे काही दहशतवादी लपल्याचे समजताच सुरक्षा दलाच्या जवानांनी तिथे शोध मोहीम हाती घेतली होती. तेव्हा झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले. याशिवाय आणखी एक अतिरेकी नंतर ठार झाला. चकमक सुरू असताना, त्यात जीनत नाईकू हा दहशतवादीही अडकल्याचे वृत्त आल्याने त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच ते मरण पावले. जीनत नाईकू हा चकमकीत ठार झाला.
जवानांनी केला अश्रुधूर, पेलेट गन्सचा मारा
दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू असताना स्थानिकांनी जवानांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे त्यांना
पांगवण्यासाठी जवानांनी अश्रुधूर, पेलेट गन्सचा मारा तसेच गोळीबार केला. त्यात एक जण ठार व १२३ जखमी झाले
असून, त्यापैकी चौघांना श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल केले आहे. याशिवाय १७ जणांच्या डोळ्याला पेलेट गन्स
लागल्या असून, त्यांची दृष्टी जाण्याची शक्यता आहे. इतर लोकही पेलेट गन्स वा दगडफेकीत जखमी झाले आहेत.