म्यानमारच्या सीमेवर भारताची धडक कारवाई, नागा बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:55 AM2017-09-28T02:55:05+5:302017-09-28T02:56:58+5:30
भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमारच्या सीमेवरील लांग्खू गावात कारवाई करून नागा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने बुधवारी पहाटे म्यानमारच्या सीमेवरील लांग्खू गावात कारवाई करून नागा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या नागा दहशतवाद्यांनी सीमेवर असलेल्या भारतीय जवानांवर हल्ला केल्यानंतर लगेचच लष्कराने पहाटे पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई केली.
लष्कराच्या ईस्टर्न कमांडने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवान म्यानमार सीमेवर गस्त घालत होते. त्यावेळी नागा बंडखोरांनी गोळीबार केला. जवानांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जोरदार कारवाई करून बंडखोरांचे तळच उद्ध्वस्त केले. कारवाईनंतर काही दहशतवादी पळून गेले आहेत. या कारवाईत एकही भारतीय जवान जखमी झाला नाही आणि भारतीय जवानांनी म्यानमारची सीमा ओलांडली नाही, हा सर्जिकल स्ट्राइक नव्हता, लष्करी कारवाई होती हेही स्पष्ट करण्यात आले.
यापूर्वीही ‘नागा’वर वार
यापूर्वी त्यांनी जून २0१५ मध्ये भारतीय जवानांवर हल्ला चढविला होता. त्यात १८ जवानांना वीरमरण आले होते. त्यावेळीही भारताने
म्यानमार सीमेवर अशीच कारवाई केली होती.
त्यात २0 नागा दहशतवादी ठार झाले होते. भारताने एनएससीएन (के) या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.
- एस. सी. खापलांग हा या संघटनेचा प्रमुख असून, तो म्यानमारमधून कारवाया करीत असतो.
सीमेवर दहशतवादी तळ
या कारवाईमध्ये अनेक नागा दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची संख्या उघड झाली नाही. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग गट) चे दहशतवाद्यांचे भारत व म्यानमारच्या सीमेवरील गावांत काही तळ आहेत. ते दहशतवादी तेथून भारतीय जवानांवर हल्ले करीत असतात.
‘आॅपरेशन अर्जुन’द्वारे भारताने शिकवला पाकला धडा
भारतीय नागरी वस्त्यांवर आणि चौक्यांवर हल्ले करणा-या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) राबविलेल्या ‘आॅपरेशन अर्जुन’मुळे पाकचे कंबरडे मोडले. सीमेवर पाकच्या लष्करी अधिका-यांच्या घरांना लक्ष्य करून झालेल्या या आॅपरेशनमध्ये पाकचे आठ सैनिक तसेच माजी सैनिक व अधिका-यांसह ११ नागरिक ठार झाले.