मलप्पुरम स्फोट प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती
By Admin | Published: November 3, 2016 01:54 PM2016-11-03T13:54:59+5:302016-11-03T13:54:59+5:30
केरळमधील मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या बाँम्बस्फोटाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
>ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. 3 - केरळमधील मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या बाँम्बस्फोटाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी सापडलेल्या पेन ड्राइव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही मंत्र्यांची छायाचित्रे तसेच बाबरी मशीद पाडतानाचे व्हिडिओ आढळून आले आहेत. तसेच दादरी येथे झालेल्या अखलाखच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अजून बॉम्बस्फोट घडवले जातील, अशी धमकी देण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
मंगळवारी मलप्पुरम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या आवारात कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटाच्या तपासादरम्यान घटनास्थळावरून एक पेन ड्राइव्ह आणि पत्र जप्त करण्यात आले होते. या पेन ड्राइव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काही मंत्री आणि भाजपाच्या काही नेत्यांची छायाचित्रे आढळली आहेत. तसेच गेल्यावर्षी उत्तर प्रदेशमधील दादरी येथे झालेल्या अखलाख याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा उल्लेख येथे सापडलेल्या पत्रात आहे.
यंदाच्या वर्षात केरळमध्ये घडलेली ही बॉम्बस्फोटाची दुसरी घटना असून, याआधी जून महिन्यात कोल्लम मधील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अशाच प्रकारे स्फोट घडवून आणण्यात आला होता. दरम्यान, केरळ सरकारने या स्फोटाच्या चौकशीसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली असून,हा स्फोट तामिळनाडूस्थित अल-उम्माह या दहशतवादी संधटनेने केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.