वेळीच ठेच लागलीय, पराभवातून सावरू आणि २०१९ मध्ये जिंकू - योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 10:50 PM2018-03-15T22:50:52+5:302018-03-15T22:50:52+5:30
प्रतिष्ठेच्या असलेल्या गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नामुष्की ओढवली होती.
लखनौ - प्रतिष्ठेच्या असलेल्या गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर नामुष्की ओढवली होती. हा पराभव योगी आदित्यनाथ यांच्या जिव्हारी लागला असून, या निवडणुकीत पक्षाला अतिआत्मविश्वान नडल्याचे म्हटले आहे. मात्र वेळीच ठेच लागली आहे. आता या पराभवातून लवकरात लवकर सावरू आणि २०१९ ची निवडणूक जिंकू, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आदित्यनाथ म्हणाले,"आम्ही अतिआत्मविश्वासाने लढलो. त्यामुळेचा आमचा पराभव झाला. निवडणूक असो वा परीक्षा तयारीची एकदा चाचपणी जरूर केली गेली पाहिजे. मात्र या पराभवातून बोध घेऊन भाजपा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल."
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत भाजपाचा धुव्वा उडाला. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणी समाजवादी पार्टीचा विजय झाला. भाजपाचा बालेकिल्ला उत्तर प्रदेशातच बसलेल्या पराभवाच्या झटक्यामुळे केंद्रीय नेतृत्वालाही मोठा धक्का बसला आहे. पुढील लोकसभा निवडणुकांसाठी ही धोक्याची घंटा मानले जाते.
गोरखपूरमधून आदित्यनाथ पाच वेळा लोकसभेवर गेले होते. त्यापूर्वी महंत अवैद्यनाथ तीन वेळा जिंकले होते. २७ वर्षांनंतर भाजपाची ही जागा गेली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रवीण कुमार निषाद यांनी भाजपाचे उपेंद्र दत्त शुक्ला यांचा २१ हजार मतांनी पराभव केला. फुलपूरमध्ये सपाचे नागेंद्र सिंग पटेल यांनी भाजपाचे कशलेंद्र सिंग पटेल यांचा ५९ हजार मतांनी पराभव झाला.