भरधाव ट्रेलरने पोलीस कर्मचा-यास चिरडले!
By admin | Published: June 28, 2016 11:00 PM2016-06-28T23:00:20+5:302016-06-28T23:21:57+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील घटना; अपघातात पोलीस कर्मचारी नितीन निखार जागेवरच ठार.
अकोला: राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर हायवे पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेल्या एका हायवे ट्रॅप पोलीस कर्मचार्यास भरधाव ट्रेलरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस कर्मचारी नितीन निखार जागेवरच ठार झाले. या प्रकरणी ट्रेलर चालकास बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळापूर शहराबाहेर असलेल्या हायवे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी नितीन निखारे मंगळवारी सकाळी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असताना खामगावकडून येत असलेल्या आरजे २७ जीए ४८८४ क्रमांकाच्या ट्रेलरला त्यांनी तपासण्यासाठी थांबण्याचा इशारा केला; मात्र ट्रेलर भरधाव असल्याने चालकाने सदर ट्रेलर राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असलेले निखार यांच्या अंगावर नेला. यामध्ये निखार ट्रेलरखाली चिरडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला; मात्र निखार यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी ट्रकलचालकाचा पाठलाग करून त्याला अटक केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत देशमुख यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त ट्रेलर बाळापूर पोलिसांनी जप्त केला असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंत्यसंस्कारासाठी पोलिसांची गर्दी
नितीन निखार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या गीता नगर येथील निवासस्थानी पोलीस अधिकार्यांसह पोलीस कर्मचार्यांची मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी रात्री गीता नगर परिसरातील नदी काठावर असलेल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
नितीन निखार निष्णात मुष्टियोद्धा
पोलीस कर्मचारी नितीन निखार हे सिनिअर मुष्टियोद्धा होते. पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी करीत पोलीस दलासाठी त्यांनी अनेक मेडल खेचून आणले होते. पोलीस दलात कार्यरत होण्यापूर्वीच ते मुष्टियोद्धा म्हणून प्रसिद्ध होते.
पोलिसांनी दिली मानवंदना
राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असताना नितीन निखार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांच्या अंतिम संस्कारापूर्वी अकोला पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी हवेत तीन राऊं ड फायर केल्याची माहिती आहे.