सेवा क्षेत्रात जाेरदार तेजी, नाेकऱ्यांमध्येही वाढ; सलग १५ महिने निर्देशांक ५०च्या वर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 06:56 AM2022-11-04T06:56:36+5:302022-11-04T06:56:41+5:30

सेवा क्षेत्राचा पीएमआय सलग १५ व्या महिन्यात ५० अंकांच्या वर राहिला. 

Strong boom in the service sector, increase in the number of employees | सेवा क्षेत्रात जाेरदार तेजी, नाेकऱ्यांमध्येही वाढ; सलग १५ महिने निर्देशांक ५०च्या वर

सेवा क्षेत्रात जाेरदार तेजी, नाेकऱ्यांमध्येही वाढ; सलग १५ महिने निर्देशांक ५०च्या वर

googlenewsNext

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिना जवळपास सर्वच क्षेत्रांसाठी लाभदायी ठरला आहे. सेवाक्षेत्रदेखील त्यास अपवाद नाही. या क्षेत्रातील नवीन व्यवसायात मजबूत वाढ झाली असून, रोजगारही भरपूर दिले आहेत. मागणीत वाढ झाल्यामुळे भारतीय सेवा क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. 

एसअँडपी ग्लोबल इंडियाने जारी केलेल्या भारतीय सेवा क्षेत्र पीएमआय निर्देशांकात ही माहिती देण्यात आली आहे. सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक ऑक्टोबरमध्ये वाढून ५५.१ अंकांवर गेला. सप्टेंबरमध्ये तो ५४.३ अंकांवर होता. सेवा क्षेत्राचा पीएमआय सलग १५ व्या महिन्यात ५० अंकांच्या वर राहिला. 

‘एसअँडपी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स’च्या आर्थिक सहयोगी संचालिका पॉलियाना डे लिमा यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये शुल्कवाढीनंतर नवीन काम मिळविण्यात सेवा क्षेत्रास फारशा अडचणी आल्या नाहीत. या क्षेत्रात विस्तार झाल्याचे पाहायला मिळाले. व्यावसायिक घडामोडी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्याही सेवादातांना वाढवावी लागली. ५० अंकांच्या वरील पीएमआय निर्देशांक तेजी, तर ५० अंकांच्या खालील पीएमआय निर्देशांक नरमाई दर्शवितो.

देशांतर्गत बाजार मुख्य स्रोत

नवीन व्यवसायासाठी देशांतर्गत बाजार हाच मुख्य स्रोत राहिला. कारण तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीलाच विदेशी विक्रीत मोठी घट झाली आहे. मार्च २०२० मध्ये कोविड-१९ साथ सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मागणी कमजोर झाली आहे. 

सलग ५ व्या महिन्यात रोजगारात वाढ 

नवीन व्यवसायात मोठी वाढ झाल्यामुळे सलग ५ व्या महिन्यात सेवा क्षेत्रातील रोजगारात वाढ पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे ही मागील ३ वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वेगवान वाढ ठरली आहे. सकारात्मक वृद्धी अंदाजामुळेही ऑक्टोबरमध्ये रोजगारात वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२३ पर्यंत व्यावसायिक घडामोडीत वाढ होईल, असा अंदाज सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३० टक्के सदस्यांनी व्यक्त केला.

Web Title: Strong boom in the service sector, increase in the number of employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.