प्रद्युम्नच्या हत्येच्या निषेधार्थ शाळेसमोर पालकांची जोरदार निदर्शनं; प्राचार्य निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 12:33 PM2017-09-09T12:33:15+5:302017-09-09T16:01:32+5:30
रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलीस तपासावर प्रश्न उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
गुरूग्राम, दि. 9- रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी पोलीस तपासावर प्रश्न उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. प्रद्युम्नची आई ज्योती ठाकूर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं की, प्रद्युम्नच्या हत्येमागील खरा गुन्हेगार वेगळा आहे. त्याला वाचविण्यासाठी बस कंडक्टरला अडकवलं जातं आहे. प्रद्युम्नने शाळेच्या स्वच्छतागृहात शाळेशी संबधीत लोकांना काही चुकीच्या गोष्टी करताना पाहिलं असेल, म्हणूनच खरा मुद्दा दाबण्यासाठी त्याची हत्या केली असेल. प्रद्युम्नची आई ज्योती ठाकूर यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासावर विश्वास नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. प्रद्युम्न हा शाळेच्या बसने शाळेत जात नव्हता, त्यामुळे कंडक्टर त्याला का मारेल ? असा सवाल ज्योती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. शाळेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पालकांनी केली.
#Gurugram: Protest continues outside #RyanInternationalSchool after body of a 7-year-old student was found in school premises yesterday pic.twitter.com/y6CaYqJMqt
— ANI (@ANI) September 9, 2017
तर दुसरीकडे शाळेत घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पालकांची शाळेसमोर निदर्शनं सुरू आहेत. यामुळे शाळेच्या जवळील नॅशनल हायवे पूर्ण जाम झाला होता. पालकांची ही निदर्शनं आजही सुरू आहेत. भोंडसीमधील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जाते आहे. प्रद्युम्नचे वडील वरूण ठाकूर यांनी शाळा प्रशासनाच्या विरोधार कारवाईची मागणी करत शनिवारी त्यांच्या वकिलांसह पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळी संबंधीत शाळेविरोधात कडक कारवाईची मागणी त्यांनी लावून धरली होती. शाळेवर कारावाई निश्चित असून शाळेच्या मुख्याध्यापकाला सस्पेंट करण्यात आलं असल्याचं वरूण ठाकूर यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
नेमकं प्रकरण काय ?
हरयाणातील रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या टॉयलेटमध्ये दुसरीत शिकणा-या ७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याचं दिसून आलं. शुक्रवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर जेमतेम अर्ध्या तासाने हा प्रकार उघडकीस आला. गुरगावमधील भोंडसी परिसरातील सोहना मार्गावर रेयान इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेच्या टॉयलेटमध्ये प्रद्युम्न नावाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला.
बस कंडक्टरने केलं कृत्य
हत्या झाल्याच्या काही तासांमध्ये पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली असून, अशोक कुमार असं त्याचं नाव आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे. अशोक कुमारने या सात वर्षांच्या या प्रद्युम्नवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध करत हा चिमुकला ओरडू लागला. आपला भांडाफोड होईल, या भीतीने अशोकने अखेर चाकूने प्रद्युम्नचा गळा कापला आणि चाकू तेथेच टाकून पळ काढला. पोलिसांनी सुरुवातीला दहा जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील काहिंनी अशोकला पळताना पाहिल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.