हृदयद्रावक! आम्हाला हिंदी नकोय; DMK कार्यालयासमोर एका व्यक्तीनं स्वत:ला पेटवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 04:50 PM2022-11-26T16:50:45+5:302022-11-26T16:58:49+5:30
थंगावेल हे डिएमके पार्टीचे माजी कृषी संघ आयोजक होते. शनिवारी सकाळी थलाइयूरच्या पक्षाच्या कार्यालयासमोर हिंदी भाषा लादण्याचा ते विरोध करत होते
दक्षिणेकडील राज्यात प्रत्येक जण स्वत:च्या मातृभाषेसाठी कडवट असल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र तामिळनाडूत घडलेल्या एका घटनेनं मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी एका शेतकऱ्याने हिंदी लादल्याचा विरोध करत स्वत:ला पेटवून घेतलं आहे. राज्यातील सिलेम जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना आहे. ८५ वर्षीय शेतकऱ्याने हिंदी लादत असल्याचा विरोध करण्यासाठी DMK कार्यालयाबाहेर आग लावून पेटवून घेतले आहे.
या मृत व्यक्तीचं नाव थंगावेल असं सांगितले जात आहे. थंगावेल हे डिएमके पार्टीचे माजी कृषी संघ आयोजक होते. शनिवारी सकाळी थलाइयूरच्या पक्षाच्या कार्यालयासमोर हिंदी भाषा लादण्याचा ते विरोध करत होते. इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. या व्यक्तीचा भाजल्यामुळे जागीच मृत्यू झाला. थंगावेल हे DMK पक्षाचे सक्रीय सदस्य होते. ते केंद्र सरकारकडून हिंदी भाषेला शिक्षणाचं केंद्र करण्याच्या निर्णयामुळे व्यथित होते.
रिपोर्टनुसार, आत्महत्येपूर्वी थंगावेल यांनी एका बॅनरवर लिहिलं होतं की, मोदी सरकार, आम्हाला हिंदी नकोय, आमची मातृभाषा तामिळ आहे. हिंदी जोकरांची भाषा आहे. हिंदी भाषा लादल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होईल. हिंदीपासून सुटका असं लिहिलं होते. दरम्यान तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष डीएमके यूक विंगचे सचिव मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा चिरंजीव उदयनिधी स्टॅलिननं इशारा दिलाय की, जर राज्यात हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही राष्ट्रीय राजधानी दिल्लीत येऊन भाजपा नेतृत्वातील केंद्र सरकारचा विरोध करू असं त्यांनी म्हटलं आहे.
तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेला विरोध
तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेविरोधात आंदोलन, निदर्शने सुरू आहेत. केंद्र सरकार लोकांच्या भावना पायदळी तुडवू शकत नाही असा इशारा डिएमकेने दिलाय. एका संसदीय समितीच्या शिफारशीवरून तामिळनाडूत वाद निर्माण झाला आहे. हिंदी भाषा राज्यात तांत्रिकी, अतांत्रिकी उच्च शिक्षण संस्था, आयआयटीमध्ये हिंदीत शिक्षण द्यायला हवं. त्यावरून केरळ, तामिळनाडू येथील मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकार हिंदी भाषा आमच्या राज्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"