ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’साठी जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:46 AM2019-09-20T04:46:58+5:302019-09-20T04:47:17+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घेत असलेल्या ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अमेरिकेत ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घेत असलेल्या ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ‘टेक्सास इंडिया फोरम’ हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. भाजपच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले गत दहा दिवसांपासून ह्युस्टनमध्ये कार्यरत असून, पीएमओच्या नियमित संपर्कात आहेत.
तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील २० आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह ६० पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील.
>‘हाउडी’चा अर्थ काय?
‘हाउडी’चा अर्थ आपण कसे आहात? दक्षिण पश्चिम अमेरिकेत या शब्दांचा उपयोग केला जातो. भारतीय- अमेरिकी समुदायाची विविधता दर्शविण्यासाठी आयोजकांनी ९० मिनिटांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे. ‘वोवन : दी इंडियन- अमेरिकन स्टोरी’ या कार्यक्रमात टेक्सास आणि देशातील ४०० कलाकार सहभागी होणार आहेत.