UP Election 2022: उत्तर प्रदेशातील नेते लंडनला जाणार की मठात? भाजप, सपा, काँग्रेस, बसपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 06:02 AM2022-03-02T06:02:53+5:302022-03-02T06:03:34+5:30
UP Election 2022: उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या.
धर्मराज हल्लाळे, लोकमत न्यूज नेटवर्क
गोरखपूर : उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा मंगळवारी थंडावल्या. शेवटच्या दोन्ही दिवसांत ५७ मतदारसंघांत दिग्गजांच्या सभा, रॅलीद्वारे भाजप, सपा, काँग्रेस आणि बसपानेही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आता कोण मठात जातो आणि कोण लंडनला, याचा फैसला जनता करणार आहे.
सपा नेते अखिलेश यादव यांनी निकालानंतर मुख्यमंत्री योगी पुन्हा मठात मुक्कामाला जातील, असे भाकीत केले आहे, तर योगी म्हणाले, निकाल लागला आहे, अखिलेश यांना इथे काम नाही, त्यांनी लंडनचे तिकीट काढले आहे. १९९८ पासून गोरखपूरमधून सलग पाचवेळा खासदार राहिलेले योगी विधानसभा मैदानात पहिल्यांदा उभे आहेत. त्यांना आव्हान देत अखिलेश गोरखपूरमध्ये तळ ठोकून आहेत. सहाव्या टप्प्यातील ५७ पैकी यापूर्वी जिंकलेल्या ४६ जागा राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. गोरखपूर शहर वगळता सर्वत्र भाजपला सपाने आव्हान दिले आहे.
कुशीनगरमध्ये मंगळवारी सकाळी भाजप उमेदवार सुरेंद्र कुशावाह यांच्या प्रचारफेरीवर हल्ला झाला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगींची सभा झाली.
प्रियांका गांधी मोटारसायकलवर
उत्तर प्रदेशची लढाई भाजप विरुद्ध सपा होत असली तरी काँग्रेस, बसपानेही माहोल बनविला आहे. तमकुहीराज येथील प्रियांका गांधी यांच्या रॅलीला मोठी गर्दी उसळली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांच्या निवासस्थानी त्या मोटारसायकलवर पोहोचल्या. दरम्यान, मंगळवारीही प्रियांका गांधी यांनी सिद्धार्थनगरमध्ये सभा घेऊन काँग्रेस जात-धर्मावर नाही तर विकासावर पुढे येईल, असे सांगितले.
कोरोना हवेत... लाखोंची गर्दी...
मंगळवारी गोरखपूरमध्ये सर्वच पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. एकाच्याही चेहऱ्याला मास्क नाही. गोरखपूरहून बस्ती, कुशीनगर, देवरिया जाणारे अनेक रस्ते युवकांच्या गर्दीने खचाखच भरलेले होते. त्याचवेळी रस्त्यावर उभे असलेले अजय त्रिपाठी म्हणाले, ‘मास्क हटा दिजिए, अब तो कोरोना हवा में है.’