मृतदेहाशेजारी बसलेल्या भुकेल्या बाळाची आईला जागं करण्यासाठी धडपड
By admin | Published: May 25, 2017 11:59 AM2017-05-25T11:59:48+5:302017-05-25T11:59:48+5:30
रेल्वे ट्रॅकशेजारी एका महिलेचा मृतदेह पडला असताना तिचं भुकेने व्याकूळ झालेलं तान्ह बाळ दूध पिण्याचा प्रयत्न करत असल्याची ह्रदय हेलावणारी घटना समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 25 - रेल्वे ट्रॅकशेजारी एका महिलेचा मृतदेह पडला असताना तिचं भुकेने व्याकूळ झालेलं तान्ह बाळ दूध पिण्याचा प्रयत्न करत असल्याची ह्रदय हेलावणारी घटना समोर आली आहे. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. एखाद्या दगडालाही पाझर फुटेल अशी ही घटना मध्यप्रदेशात घडली आहे. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
बुधवारी सकाळी काही लोकांना दामोह येथे या महिलेचा मृतदेह आढळला. शेजारी तिचं एक वर्षाचं मूल ज्याला आपल्या आईचा मृत्यू झाल्याची कल्पनाही नव्हती ते आईच्या अंगावर खेळत तिला उठवण्याचं प्रयत्न करत होतं. भुकेने व्याकूळ झालं असल्याने ते बाळ दूध पिण्याचाही प्रयत्न करत होतं. शेवटी तिथे पडलेलं एक बिस्कीट जे कदाचित त्याच्या आईने त्याला दिलं असावं ते खात बसलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहीजणांनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ट्रेनमधून खाली पडून नाहीतर ट्रेनने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दुर्घटनेवेळी महिलेने बाळाला घट्ट पकडून ठेवलं असावं, ज्यामुळे ते वाचलं असा अंदाज आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर महिला काही वेळासाठी शुद्धीत असावी. यादरम्यान तिने आपल्या बाळाची भूक मिटवण्याचा प्रयत्न केला असावा.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह उचलल्यानंतर बाळाचं रडणं ऐकून काही वेळासाठी अधिकारीही हेलावले. घटनास्थळी महिलेचा पर्स सापडली असून त्याआधारे तिच्या नातेवाईकांचा पत्ता मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.