संघर्ष वाढला ! हिंदी महासागरात चीनने तैनात केल्या युध्दनौका
By admin | Published: July 4, 2017 10:05 AM2017-07-04T10:05:01+5:302017-07-04T11:11:24+5:30
सिक्कीम सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारतही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याने चीनने आता समुद्रात शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - सिक्कीम सीमेवर चीनच्या आक्रमकतेला भारतही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत असल्याने चीनने आता समुद्रात शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. मागच्या काही दिवसात हिंदी महासागरात चीनी युद्धनौकांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, समुद्रातील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष आहे.
सिक्कीमच्या डोकलाम भागात चीनच्या रस्ते बांधणीवर भारताने आक्षेप घेतल्याने हा सर्व तणाव निर्माण झाला आहे. भारताने इथून मागे हटावे यासाठी चीन युद्धखोरीची भाषा करुन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारतावर दबाव वाढवण्यासाठी चीनने आता हिंदी महासागरात युद्धनौकांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे.
मागच्या दोन महिन्यात जीसॅट-7 उपग्रह, Poseidon-8I टेहळणी विमान आणि भारतीय युद्धनौकांना हिंदी महासागरात चीनी नौदलाच्या 13 युनिटस आढळल्या आहेत. यात क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या विनाशिकांचा समावेश आहे.
आणखी वाचा
सध्या भारत आणि चीनमध्ये जोरदार शाब्दीक लढाई सुरु आहे. भारताने इतिहासापासून धडा घ्यावा, 1962 मधील पराभव विसरु नये असा इशारा काही दिवसांपूर्वी चीनकडून देण्यात आला होता. चीनच्या या विधानाला भारत आता 1962 सारखा राहिलेला नाही असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते. जेटलींना प्रत्युत्तर देताना चीनसुद्धा 1962 चा राहिलेला नाही असं चीनने म्हटलं आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी सोमवारी जेटलींच्या विधानाला प्रत्युत्तर देताना चीनमध्येही खूप बदल झाला आहे, 1962 चा चीन आता राहिलेला नाही अशा शब्दांमध्ये धमकी दिली आहे. तसेच पेईचिंग आपल्या सार्वभौमत्वासाठी आणि संरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतो, अशी धमकी शुआंग यांनी दिली.
सिक्कीमच्या डोकलाम भागात भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा मिळतात. चीनला इथे रस्ता बांधायचा आहे. चीनला इथपर्यंत सहज प्रवेश मिळाला तर, त्यांना भारतीय सैन्याच्या ईशान्यकडेच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होईल. त्यामुळेच भारताचा चीनच्या रस्तेबांधणीला विरोध आहे. चीनने मागच्या आठवडयात या भागात भारताचे दोन बंकर्स बुलडोझरच्या सहाय्याने उध्वस्त केले होते.