‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 05:52 AM2024-05-08T05:52:32+5:302024-05-08T05:52:43+5:30
मतुआ, मुस्लीमबहुल मतदार ठरणार ‘गेमचेंजर’
- याेगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत दहा जागांवर मतदान झाले असून उर्वरित ३२ जागांवर निवडणूक शिल्लक आहे. बहुतांश जागांवर तृणमूल काँग्रेस व भाजप या दोन पक्षांमध्ये थेट लढत असली तरी काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीने अनेक ठिकाणी आव्हान दिले आहे. अशा स्थितीत तृणमूलकडून स्थानिक मुद्द्यांवर जोर देत ‘बंगाली प्राईड’चा नारा देण्यात येत आहे. तर भाजपकडून विकास व अराजकतेच्या मुद्यावरच मत मागण्यात येत आहे.
रालोआने ४०० पारचा नारा दिला असल्याने बंगालमधून कमीत कमी २५ जागा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १९७१ नंतर बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने बहुमत मिळविलेले नाही. अशा स्थितीत भाजपच्या प्रत्येक रणनीतीवर तृणमूल व काँग्रेस-डाव्यांची बारीक नजर आहे. राज्यातील दक्षिण बंगाल भागात तृणमूलचे वर्चस्व असून तेथील १५ जागांवरदेखील विजय मिळविण्याचे तृणमूलचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मुस्लिमबहुल मतदारसंघात सीएएच्या मुद्यावरून भाजपविरोधात जोरदार प्रचार सुरू आहे.
चित्रपट कलाकार रिंगणात
मतदारांना आकर्षित करण्यासाठी तृणमूलने सहा चित्रपट कलाकारांना रिंगणात उतरविले आहे. यात शत्रुघ्न सिन्हा, शताब्दी रॉय, रचना बॅनर्जी, दीपक अधिकारी, सायोनी घोष, जून मालिया यांचा समावेश आहे. तर भाजपने लॉकेट चॅटर्जी व हिरन चॅटर्जी यांना तिकीट दिले आहे. सीपीआय (एम)ने ओटीटीवरील लोकप्रिय चेहरा देवदत्त घोष यांना उमेदवारी दिली आहे
हिंसाचार प्रचाराचा मुद्दा
मागील काही आठवड्यात पश्चिम बंगालमधील विविध भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना झाल्या. संदेशखालीच्या मुद्यावरून भाजपने तृणमूलला टार्गेट केले होतेच. आता या घटनांनादेखील प्रचाराचा मुद्दा बनविण्यात आला आहे.
राष्ट्रीय पातळीवर झालेला विकास, बंगालमधील गरिबांचे इतर राज्यांत स्थलांतर, राज्यातील बेरोजगारी व अराजकता या मुद्यांवर भाजपकडून मतं मागण्यात येत आहेत. मतुआ समाजाची मते मिळविण्यावर भाजपचा भर आहे. तर काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीकडून दोन्ही पक्षांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत उर्वरित ३२ मतदारसंघ पिंजून काढण्यात येत आहेत.