पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, भाजपतील संघर्ष उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 04:59 AM2019-05-26T04:59:22+5:302019-05-26T04:59:27+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.
कोलकाता : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.
आपल्या अनेक कार्यालयांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ले केले असून, अनेक कार्यालये ताब्यात घेण्यात आली आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील सीताई आणि तितागढ तसेच कोलकाताजवळील न्यू टाऊन भागात भाजप समर्थकांनी तृणमूल कार्यकर्त्यांवर हल्ले केले आहेत. भाजप विजयी झालेल्या कूचबिहारमधील बक्षीरहाट, महिशकुची, रामपूर आणि शालबारी येथील तृणमूलची कार्यालये भाजप समर्थकांनी उद्ध्वस्त केली. सितलकुची येथील कार्यालयही फोडण्यात आले.
तृणमूलचे सितलकुची गटाचे अध्यक्ष आबेद अली मिया यांनी सांगितले की, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयांना एक तर कुलपे लावली अथवा कार्यालयांची तोडफोड केली.
कुचबिहार लोकसभा मतदारसंघात भाजपचे निशित प्रामाणिक यांनी तृणमूलचे परेश अधिकारी यांचा पराभव केला आहे.
भाजपनेही तृणमूल कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप केला आहे. बक्षीरहाट येथील विजयी मिरवणुकीवर तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूलने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
तृणमूल काँग्रेसने म्हटले की, सीताई येथील आपल्या महिला नेत्याच्या घरावर गावठी बॉम्ब फेकण्यात आला. भाजपचा विजय झालेल्या बंकुरा येथेही अशीच घटना घडली. भाजपने म्हटले की, बंकुरा येथे आपल्या एका स्थानिक नेत्यावर गोळीबार करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विवेकानंद पात्रा यांनी सांगितले की, सालतोरा येथे स्थानिक भाजप नेते विद्युत दास यांच्यावर विजयी मिरवणुकीदरम्यान हल्ला करण्यात आला. स्थानिक तृणमूल नेता काली रॉय यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तृणमूलचे जिल्हाध्यक्ष अरूप खान यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे. दोन्ही बाजूंनी तक्रारी देण्यात आल्याचे बंकुरा पोलिसांनी सांगितले. पंचमुरा जिल्ह्यात तृणमूलच्या कामगार संघटनेचे कार्यालय फोडण्यात आले. काही नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले.
>वाहने जाळली
भाजप विजयी झालेल्या बराकपूरमधील भातपारा आणि काकिनाडा येथेही तृणमूलच्या कार्यालयांवर हल्ले झाले. अनेक ठिकाणी वाहने जाळण्यात आली. नादिया जिल्ह्यातील चाकडाह येथील २३ वर्षीय भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.