कुणाच्या आडमुठेपणामुळे युती तुटली, ते जनताच ठरवेल - फडणवीस

By admin | Published: September 29, 2014 07:13 AM2014-09-29T07:13:46+5:302014-09-29T12:31:32+5:30

शिवसेना-भाजप युती कुणाच्या आडमुठेपणामुळे तुटली, ते आता जनताच ठरवेल, असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

With the stubbornness of the alliance, the people will decide - Fadnavis | कुणाच्या आडमुठेपणामुळे युती तुटली, ते जनताच ठरवेल - फडणवीस

कुणाच्या आडमुठेपणामुळे युती तुटली, ते जनताच ठरवेल - फडणवीस

Next

शिवसेना-भाजप युती कुणाच्या आडमुठेपणामुळे तुटली, ते आता जनताच ठरवेल. परंतु युती तुटल्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळतानाच उद्धव व राज ठाकरे यांच्यातील राजकीय दुरावा कमी झाला तर उत्तम होईल, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

विधानसभा निवडणुकीत भाजपाला संपूर्ण बहुमत प्राप्त होणार असल्याने सत्ता स्थापनेकरिता कुणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

प्रश्न- उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. आपले काय मत आहे?


फडणवीस- भाजपाने असा निर्णय केला आहे की जे घडून गेले त्याकडे वळून पाहायचे नाही. कुणाच्या आडमुठेपणामुळे युती तुटली, हे आता जनताच ठरवेल. भाजपाचे टार्गेट शिवसेना नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी आमची थेट लढाई आहे. त्यांना पराभूत करून महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार आणणे याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत. त्यामुळे उद्धव यांच्या वक्तव्यावर आम्ही ना टीका करणार ना टिप्पणी.


प्रश्न- युती तुटल्याने या निवडणुकीत मराठी विरुद्ध गुजराती संघर्ष तीव्र होईल का?


फडणवीस- मला बिलकूल तसे वाटत नाही. राज्यातील भाजपाचे नेतृत्व परप्रांतीय नाही. गडकरी असो की खडसे, तावडे असो की सुधीरभाऊ, पंकजाताई असो की मी; आम्ही सगळे महाराष्ट्रातील आहोत, मराठीच आहोत. त्यामुळे या निवडणुकीत मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष होणार नाही. ही निवडणूक जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन लढवली जाईल. विकास आणि सुशासन हाच या निवडणुकीचा अजेंडा आहे. त्याकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न कुणी केला तरी त्याला यश मिळणार नाही.


प्रश्न- निवडणुकीनंतर वेळप्रसंगी सरकार स्थापनेकरिता कुठल्या पक्षाची साथ घेणार?


फडणवीस- निवडणुकीत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळणार असल्याने कुणाला सत्तेकरिता सोबत घेण्याची गरज भासणार नाही. विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याचा प्रश्नच नाही.


प्रश्न- उद्धव व राज ठाकरे यांना एकत्र आणण्याचा भाजपाने सातत्याने प्रयत्न केला. आता भाजपाची युती तुटल्यावर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. तुम्ही त्याकडे कसे पाहता?


फडणवीस- उद्धव व राज यांच्यातील राजकीय दुरावा कमी होत असेल तर ते उत्तम आहे. दोन भावांत दुरावा राहू नये याकरिता आम्ही प्रयत्न केला. परंतु याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवे.


प्रश्न- भाजपातील सामूहिक नेतृत्वामुळे निर्नायकी अवस्थेतून शिवसेनेबरोबरची युती तुटली का?


फडणवीस- मला बिलकूल तसे वाटत नाही. अन्य राजकीय पक्ष व भाजपा यांच्यात मूलभूत फरक हाच आहे की, अन्य पक्ष हे एका परिवाराचे पक्ष आहेत तर भाजपा एका परिवाराचा पक्ष नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत सामूहिकतेला प्राधान्य आहे. कुणी एक पक्षाचा मालक नाही. आमच्यापैकी एकजण अध्यक्ष असला तरी इतरांचे ऐकून त्याला निर्णय घ्यावा लागतो. सामूहिक निर्णयाची ही प्रक्रिया आमच्या अंगवळणी पडली आहे. एका व्यक्तीने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत निर्णय कदाचित जलद होत असले तरी त्यामध्ये वस्तूनिष्ठता आणि सामूहिकतेचा अभाव असतो.


प्रश्न- मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तुमचे नाव आघाडीवर असले तरी पक्षात आणखी चार स्पर्धक आहेत...?


फडणवीस- मी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने पक्ष जिंकला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. भाजपाचे केंद्रीय निवड मंडळ याबाबत निर्णय घेईल. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. भाजपात मुख्यमंत्रीपदाकरिता स्पर्धा आहे हेच मुळात मला मान्य नाही. प्रसिद्धी माध्यमांनी हे चित्र रंगवले आहे.


प्रश्न- युतीतून बाहेर पडून निवडणूक लढवण्याचा निर्णय हा मोठा धोका तुम्ही पत्करला आहे का? यदाकदाचित भाजपाचा पराभव झाला तर त्यामुळे तुमची राजकीय कारकीर्द संकटात येईल असे वाटत नाही का?


फडणवीस- मला या निर्णयात जराही धोका वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी असे म्हणाले होते की, हम चले न चले देश चल चुका है. हीच स्थिती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आहे. महाराष्ट्रातील जनतेने एका पक्षाचे बहुमताचे सरकार आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा पर्याय जनता स्वीकारणे शक्यच नाही. केंद्रातील मोदी सरकारच्या हातात हात घालून महाराष्ट्रात कोणते सरकार चालू शकते हे जनतेला माहीत आहे. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार असेल तर कामे वेगाने होतात हे जनतेला पटलेले आहे. जनतेचा निर्णय झाला आहे आता तो केवळ मतामध्ये परावर्तीत होऊन राज्यात भाजपाप्रणीत महायुती सत्तेवर येण्याचे केवळ औपचारिकता बाकी आहे.

Web Title: With the stubbornness of the alliance, the people will decide - Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.