रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्टर ३ किमी धावले; कधी पायपीट तर कधी रेल्वे रूळ ओलांडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:56 AM2022-09-13T05:56:48+5:302022-09-13T05:57:05+5:30
मध्य बंगळुरू ते मनिपाल रुग्णालय, सरजापूर असा डॉ. नंदकुमार यांचा दररोजचा प्रवास आहे. ३० ऑगस्ट रोजीही ते वेळेवर घरून निघाले होते.
बंगळुरू : येथील एका डॉक्टरने सेवावृत्तीचा असा काही वस्तुपाठ घालून दिला की जो पण त्यांच्याविषयी ऐकत आहे तो त्यांची प्रशंसाच करत आहे. या डॉक्टरांची कार वाहतूक कोंडीत अडकली होती. रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी कार सोडून तीन किलोमीटर धावत त्यांनी रुग्णालय गाठले आणि रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रियाही केली. डॉ. गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरांचे नाव असून, ते गॅस्ट्रोएन्टॅरोलॉजिस्ट आहेत.
मध्य बंगळुरू ते मनिपाल रुग्णालय, सरजापूर असा डॉ. नंदकुमार यांचा दररोजचा प्रवास आहे. ३० ऑगस्ट रोजीही ते वेळेवर घरून निघाले होते. त्या दिवशी एका महिलेवर तातडीची लॅप्रॉस्कोपिक गॉलब्लॅडर शस्त्रक्रिया करायची होती. शस्त्रक्रियागारात सर्व तयारी झाली होती. कर्मचारी वृंद सज्ज होता. मात्र, वाटेत सरजापूर-मराठल्ली येथे नंदकुमार यांची कार वाहतूक कोंडीत अडकली. बंगळुरूत वाहतूक कोंडी नियमित बाब आहे. ही कोंडी फुटण्यासाठी बराच वेळ लागणार होता. एवढा वेळ थांबणे रुग्णाच्या दृष्टीने ठीक नव्हते. त्यामुळे त्यांनी गुगल मॅपवर रुग्णालयाचे अंतर तपासले. मॅॅप जवळपास ३ कि. मी. अंतर असल्याचे दाखवत होता. त्यानंतर त्यांनी कारला चालकासह सोडून देत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली व वेळेवर रुग्णालयात पोहोचून रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
कधी पायपीट तर कधी रेल्वे रूळ ओलांडले
डाॅ. नंदकुमार यांनी त्यांचा धावण्याचा एक छोटा व्हिडीओ बनवला होता. तो त्यांनी सोमवारी समाजमाध्यमावर शेअर केला.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला अशा स्थितीचा सामना करावा लागण्याची ही पहिली वेळ नाही. बंगळुरूच्या अनेक भागात अनेकवेळा पायपीट करावी लागते. कधीकधी रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. त्या दिवशी रुग्ण आणि रुग्णाचे कुटुंबीयही डॉक्टरांची प्रतीक्षा करत होते. एखादी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली तर रुग्णाचे काय होईल, असाच विचार सगळे करीत होते. कारण, तेथे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागाच नव्हती, असे ते म्हणाले.