जेएनयूमध्ये विद्यार्थी व प्रशासन आमने-सामने; निवडणुकीतील हस्तक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:37 AM2019-09-13T01:37:43+5:302019-09-13T01:37:51+5:30
आरोप-प्रत्यारोप सुरूच
उमेश जाधव
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपावरून विद्यार्थी आणि प्रशासन आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. प्रशासनाचा निषेध करताना डाव्या संघटनांनी बुधवारी आणि गुरुवारी प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केले.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. लिंगडोह समितीच्या सूचनांचे उल्लंघन करून निवडणूक घेण्यात आल्याप्रकरणी न्यायालयात दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली. त्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी डीन उमेश कदम यांनी निवडणूक समितीला समन्स बजावली होती. समन्सला उत्तर देण्यासाठी कदम यांच्या कार्यालयात गेलो असता प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप निवडणूक समिती आणि विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तर विद्यार्थ्यांनी एका खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
कदम यांनी निवडणूक समितीच्या सदस्यांना नोटीस पाठवून याप्रकरणी बुधवारी सकाळी उत्तर देण्यास सांगितले होते. कदम हे तक्रार निवारण विभागाचेही प्रमुख आहेत. सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत निवडणूक समितीचे सदस्य कार्यालयात आले नाही.
सायंकाळी साडेपाच वाजता हे सदस्य कार्यालयात आले. मात्र, कार्यालय बंद झाल्यामुळे त्यांचे उत्तर स्वीकारण्यात आले नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दरवाजावर आंदोलन करून आम्हाला कोंडून ठेवले. त्यामुळे रक्तदाब वाढल्याने मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले, असे कदम यांनी सांगितले. विद्यापीठ प्रशासनाने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला आहे.
त्यांमुळे विद्यार्थी संघटनांच्या संयम सुटला असून त्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक समितीतील सदस्यांचाही मानसिक छळ सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (जेएनएसयू) घटनेचे उल्लंघन करण्यात येत आहे, असे विद्यार्थी नेता साकेत मून याने सांगितले.
जेएनयूमध्ये लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये बदल करून त्यात प्रशासनाचा हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही लढा देऊ. - एन. साई बालाजी, प्रभारी अध्यक्ष, जेएनएसयू