मजुरांना रोजगार देण्यासाठी विद्यार्थ्याचे अॅप, स्थलांतरितांना मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 05:30 AM2020-07-07T05:30:18+5:302020-07-07T11:43:27+5:30
स्थलांतरित मजूर गावी परतले असले तरी त्यातील बहुतेकांच्या हातात रोजगार नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा शहरात कामधंद्यासाठी परतण्याची इच्छा आहे. अशा मजुरांना काम देऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांना त्यांच्याशी भारत श्रमिक अॅपच्या माध्यमातूनही संपर्क साधता येणार आहे.
नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांना काम देण्यासाठी उद्योजकांना त्यांच्याशी संपर्क साधता यावा याकरिता नॉयडामधील अक्षत मित्तल या १७ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याने भारत श्रमिक नावाचे अॅप तयार केले आहे. कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यावर लाखो स्थलांतरित मजूर विविध राज्यांत अडकून पडले होते. गावी परतताना मजुरांचे विलक्षण हाल झाले होते.
स्थलांतरित मजूर गावी परतले असले तरी त्यातील बहुतेकांच्या हातात रोजगार नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा शहरात कामधंद्यासाठी परतण्याची इच्छा आहे. अशा मजुरांना काम देऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांना त्यांच्याशी भारत श्रमिक अॅपच्या माध्यमातूनही संपर्क साधता येणार आहे. त्यासाठी अक्षत मित्तल याने भारतश्रमिक डॉट इन ही वेबसाइट वडील आशिष मित्तल यांच्या मदतीने सुरू केलीे. रोजगाराच्या शोधात असलेल्या स्थलांतरित मजुरांनी आपल्या कौशल्याची माहिती घरचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आदी तपशील या वेबसाइटवर द्यायचा आहे. अनेक स्थलांतरित मजुरांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी अक्षत मित्तल याने एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. त्यावर या मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार तो तपशील या वेबसाइटवर झळकविण्यात येईल. स्थलांतरित मजुरांकडील कौशल्य व इतर तपशील उद्योजक भारतश्रमिक डॉट इन या वेबसाइटवर किंवा अॅपवर पाहून त्यांना आवश्यक वाटणाऱ्या मजुरांना नोकऱ्या देऊ शकतील.
देशातील समस्या लक्षात घेऊन ती सोडविण्यास मदत करणारी वेबसाइट तयार करण्याची अक्षत मित्तलची ही पहिलीच वेळ नाही. दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करण्याकरिता वाहनांसाठी सम-विषम योजना २०१६मध्ये लागू करण्यात आली. त्यावेळी वाहनधारकांच्या मदतीसाठी अक्षत मित्तल याने कारपूलिंगचे अॅप विकसित केले होते.
१८ हजार जणांनी केली नोंदणी
अक्षत मित्तल याने सांगितले की, स्थलांतरित मजुरांच्या स्थितीविषयी माझ्या ८० वर्षे वयाच्या आजोबांनी मला नीट माहिती दिली. कोरोनाच्या साथीमुळे अनेकांच्या हातचे रोजगार गेले आहेत. गावी परतलेल्या लोकांना रोजगारासाठी पुन्हा शहरात यायचे आहे. त्यामुळे हे मजूर व उद्योजक यांना परस्परांशी संपर्क साधता यावा म्हणून सुरू केलेल्या भारत श्रमिक अॅपवर आतापर्यंत १८ हजार मजुरांनी नोंदणी केली आहे. लॉकडाऊन मागे घेण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली असून, अशा वेळी हे अॅप व वेबसाइट उत्तम उपयोगी ठरू शकते.
भारत श्रमिक अॅप मॅचमेकिंग तंत्रज्ञानाचा वापर करते. भारत श्रमिक अॅप रोजगाराची गरज असलेले मजूर आणि मजुरांची आवश्यकता असलेले नियोक्ते यांच्यातील दुवा आहे. +91 8822 022 022 क्रमांकावर संपर्क साधून मजूर त्यांची नोंदणी करू शकतात. या मजुरांची माहिती रोजगार देणाऱ्या माणसांना www.bharatshramik.in उपलब्ध होते. ही माहिती पाहून संबंधित व्यक्ती मजुरांशी संपर्क साधू शकते. त्यामुळे दोघांनाही याचा फायदा होतो.
+91 8822 022 022 हेल्पलाईन क्रमांकावरील सुविधा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या माध्यमातून तीन सोप्या टप्प्यांमध्ये मजुरांची नोंदणी होते. सुरुवातीला मजुरांना त्यांची भाषा निवडावी लागते. त्यानंतर त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा रोजगार हवा आहे, त्याची नोंद करावी लागते. आपल्याला कोणत्या भागात रोजगार हवा आहे, त्याचा पिनकोड शेवटी मजुरांना नोंदवावा लागतो.
मजुरांनी भरलेली माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार देऊ इच्छिणाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. भारत श्रमिकला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत असून नोंदणी करणाऱ्या मजुरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यासोबतच रोजगार देऊ इच्छिणाऱ्या अनेकांनी भारत श्रमिकशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
येत्या काळात अॅप फायदेशीर ठरणार
लॉकडाऊनच्या काळात लाखो मजूर त्यांच्या घरी परतले. हातावर पोट असणाऱ्यांनी आपल्या घरची वाट धरली. या मजुरांनी त्यांच्या राज्यांमध्ये रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामीण भागात फारशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली. आता लॉकडाऊन शिथिल होताच मजूर पुन्हा शहरांमध्ये परतू लागले आहेत. या मजुरांना रोजगार शोधताना भारत श्रमिक अॅपचा फायदा होणार आहे.
(‘फेसबुक’ने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा
प्रभाव नाही.)