बीफ फेस्टला पाठिंबा न देणा-या राहूल ईश्वरवर विद्यार्थ्यांचा हल्ला
By admin | Published: October 8, 2015 02:46 PM2015-10-08T14:46:06+5:302015-10-08T14:46:06+5:30
बीफवरून केरळमध्ये वातावरण चांगलेच तापत असून आता राहूल इश्वर या सामाजिक कार्यकर्त्याला लक्ष्य करण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोची, दि. ८ - बीफवरून केरळमध्ये वातावरण चांगलेच तापत असून आता राहूल इश्वर या सामाजिक कार्यकर्त्याला लक्ष्य करण्यात आले आहे. कयामकुलममधल्या एका कॉलेजमध्ये कार्यक्रमासाठी गेलेल्या राहूलच्या गाडीची विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. महाविद्यालयातल्या बीफ फेस्टला राहूलने पाठिंबा द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. जिला त्याने नकार देताच त्याची हिंसक प्रतिक्रिया उमटली आहे.
विवाहपूर्व शिक्षण यावर लेक्चर देण्यासाठी मी त्या महाविद्यालयात गेलो होतो. त्यावेळी २५ - ३० विद्यार्थ्यांनी माझी गाडी अडवली. केरळमधल्या महाविद्यालयांमधल्या बीफ फेस्टना मी पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात आली, जिला मी नकार देताच माझ्यावर शारिरीक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे राहूलने सांगितले आहे.
बीफ फेस्टला पाठिंबा द्यायचा अथवा नाही हा माझा व्यक्तिगत प्रश्न असल्याचे त्याने सांगितले. एखाद्याला अशी जबरदस्ती करणं हा ही सांस्कृतिक दहशतवादाचाच एक प्रकार असल्याचं त्यानं म्हटलंय. त्याने कोल्लाम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एखाद्याला कुठला फेस्टीवल आयोजित करायचा असेल तर करू दे की, पण त्याला मी पाठिंबा द्यायलाच हवा या मागणीत काय अर्थ आहे असा त्याचा सवाल आहे. घटनेच्या आर्टिकल ४८मध्ये स्पष्टपणे गोहत्याबंदी असताना आणखी वेगळी स्पष्टता काय हवी असा सवालही त्यानं ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.
दरम्यान, सदर महाविद्यालयाने राहूल ईश्वरकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.