विद्यार्थिनीने तयार केले पहिले कार्बन निगेटिव्ह शौचालय; माती, पाणी, सिमेंटचा वापर नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 07:03 AM2022-10-31T07:03:06+5:302022-10-31T07:03:14+5:30
चार लाख प्लास्टिक पिशव्यांवर पुर्नप्रक्रिया करून बांधकामात वापर
अमृतसर : केवळ एकाच वेळी वापरता येणाऱ्या (सिंगल यूज) सुमारे चार लाख प्लास्टिक पिशव्या व कचऱ्यातील इतर काही गोष्टींवर पुर्नप्रक्रिया करून त्यांच्या साहाय्याने रुहानी वर्मा या इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने देशातील पहिले कार्बन निगेटिव्ह सार्वजनिक शौचालय उभारले आहे. अमृतसर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात बांधलेल्या या शौचालयाला ‘टॉयलेट ०१’ असे नाव देण्यात आले आहे.
या शौचालय संकुलाचे अमृतसर विमानतळाचे संचालक व्ही.के. सेठ व खासदार गुरजीत अलुजा यांनी नुकतेच उद्घाटन केले. जयपूर येथील जयश्री पेरिवाल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत असलेल्या रुहानी वर्मा हिने सांगितले की, देशातील पहिले कार्बन निगेटिव्ह सार्वजनिक शौचालय तयार करण्यासाठी पर्यावरणाची अजिबात हानी न करणाऱ्या विटांचा वापर केला आहे. या शौचालयाच्या बांधकामात वापरलेल्या विटांपैकी ३० टक्के विटा या सिंगल यूज प्लास्टिकपासून तर ७० टक्के विटा या कचरा, सिलिका डस्टपासून तयार केल्या आहेत. रुहानी वर्मा हिने सांगितले की, सिंगल यूज प्लास्टिकनेही पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. दरवर्षी ही समस्या तीव्र होत चालली आहे.
माती, पाणी, सिमेंटचा वापर नाही
रुहानी वर्मा हिने सांगितले की, पहिले कार्बन निगेटिव्ह शौचालय उभारण्यासाठी वापरलेल्या सिलिका विटा तयार करताना माती, पाणी, सिमेंट आदी गोष्टींचा वापर केलेला नाही. कचऱ्यातील गोष्टींपासून या विटा तयार करण्यात आल्या आहेत. त्याआधी या सर्व गोष्टींवर पुर्नप्रक्रिया करण्यात आली. मातीच्या विटेपेक्षा सिलिकाची वीट ही तीनपट मजबूत असते.
आणखी पर्यावरणस्नेही वास्तू उभारणार
रुहानी वर्मा हिने सांगितले की, अमृतसर येथील विमानतळावर उभारण्यात आलेले कार्बन निगेटिव्ह शौचालय बांधण्यासाठी पुर्नप्रक्रिया केलेल्या चार लाख प्लास्टिक पिशव्या वापरण्यात आल्या. या पिशव्या एका सरळ रेषेत मांडल्या तर त्यांची लांबी १५० किमी होईल. रुहानी वर्मा भविष्यात आणखी पर्यावरणस्नेही वास्तू उभारणार आहे.