विद्यार्थ्याला ‘कसाब’ म्हटले, शिक्षक निलंबित; चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:32 AM2022-11-29T06:32:40+5:302022-11-29T06:33:05+5:30
सॉरी बोलून तुम्ही काय विचार करता हे बदलत नाही, असेही विद्यार्थी शिक्षकाला सुनावतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
बंगळुरू : अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याचे दहशतवाद्याच्या नावे संबोधन केल्याप्रकरणी कर्नाटकातील बंगळुरूच्या मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)मधील एका शिक्षकाचे निलंबन करण्यात आले. शिक्षकाने वर्गात त्याला ‘कसाब’ असे संबोधल्यानंतर विद्यार्थ्याने आक्षेप घेतला. व्हिडीओत शिक्षक विद्यार्थ्याची माफी मागताना दिसतो. त्यावर, तुम्ही शिक्षक आहात... इतक्या जणांसमोर तुम्ही मला दहशतवादी कसे बोलू शकता? अशी विचारणा विद्यार्थी त्या शिक्षकाला करतो. सॉरी बोलून तुम्ही काय विचार करता हे बदलत नाही, असेही विद्यार्थी शिक्षकाला सुनावतो.
प्राध्यापक निलंबित
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राध्यापकाला निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संस्थेने सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र संस्थेनेच या प्रकरणाची दखल घेत प्राध्यापकाला निलंबित केले
आहे.