"मी दहशतवादी आहे…", विमानतळावर इंजिनीअरिंग विद्यार्थ्याचा आरडाओरडा, कारण जाणून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:53 AM2024-02-22T10:53:12+5:302024-02-22T10:58:12+5:30
तरुणाचे समुपदेशन करण्यासोबतच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली आहे.
Student calls self terrorist to avoid going home (Marathi News) बंगळुरू : बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र घटना घडली आहे. केम्पेगौडा विमानतळावरून लखनौला जाणाऱ्या विमानात बसलेल्या एका तरुणाने अचानक दहशतवादी असल्याचे सांगून दहशत पसरवली. यानंतर सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले आणि तरुणाला अटक करण्यात आली. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर हा तरुण दहशतवादी नसून इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असून त्याने विमानातून उतरण्यासाठी नाटक केल्याचे उघड झाले आहे.
विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 17 फेब्रुवारीच्या रात्री घडली. आरोपी तरुणाचे नाव आदर्श कुमार सिंह असून तो लखनऊचा रहिवासी आहे. तो येथील एका खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये बी.टेक.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. वडिलांच्या सांगण्यावरून त्याने बंगळुरूहून लखनौला घरी जाण्यासाठी एअर एशियाचे विमान तिकीट काढले होते. त्यानंतर विमानाच्या नियोजित वेळेनुसार तो विमानतळावर पोहोचला. पण टेक-ऑफच्या काही मिनिटांपूर्वी त्याने आपण दहशतवादी असून हे विमान आता टेक ऑफ होणार नाही, असे ओरडून सांगितले.
तरुणाच्या कृत्यामुळे काहीवेळ विमानतळावर एकच खळबळ उडाली. यानंतर क्रू मेंबरनी सुरक्षा यंत्रणांना तात्काळ माहिती दिली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने विमानाला घेराव घातला आणि तरुणाला ताब्यात घेतले. यानंतर आरोपी तरुणाची चौकशी केली असता त्याने सांगितले की, मला विमानातून उतरायचे होते. यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे मी स्वत: दहशतवादी असल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी आरोपी तरुणाला संबंधित कलमांतर्गत अटक केली आणि तपास पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
तरुणाने पोलिसांना सांगतिले की, "मी अभ्यासात कमकुवत आहे. माझी इच्छा नसतानाही माझ्या वडिलांनी मला येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन दिले. आता माझ्या पहिल्या वर्षाचा निकाल खराब आला आहे. त्यामुळे मला वडिलांनी घरी बोलावले आहे. मी तिकीट काढले आणि विमानात चढलो, मात्र, घरी पोहोचल्यावर वडिलांकडून ओरडा खावा लागेल, असे मला वाटले. त्यामुळे विमानातून उतरण्यासाठी मी दहशतवादी आहे, असे ओरडण्याचा निर्णय घेतला." दरम्यान, आरोपी तरुणाचे समुपदेशन करण्यासोबतच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली आहे.