मॉनिटर न केल्यानं नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:57 PM2018-07-13T12:57:08+5:302018-07-13T12:58:40+5:30
राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं
बंगळुरु : शिक्षकांनी मॉनिटर न केल्यानं नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. बंगळुरूतील राजराजेश्वरीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. मात्र त्यांच्या आत्महत्येच्या कारणाची माहिती मिळू शकलेली नाही.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आर. ध्रुवराज असून तो बॉल्डविन को-एज्युकेशन एक्सटेंशन हायस्कूलमध्ये शिकत होता. 'महिन्याभरापूर्वी ध्रुवराजच्या वर्गाचा मॉनिटर निवडण्यात आला होता. यासाठी चार मुलं इच्छुक होती. मॉनिटर म्हणून आपलीच निवड होईल, असा विश्वास ध्रुवराजला होता. मात्र त्याची निवड करण्यात आली नाही,' असं ध्रुवराजची आई दिव्या यांनी सांगितलं. 'मॉनिटर म्हणून निवड न झाल्यानं ध्रुवराज नाराज होता. आपल्याकडे नेतृत्त्व करण्याची क्षमता आहे. मात्र तरीही आपली निवड न झाल्यानं तो अस्वस्थ होता,' असंही दिव्या म्हणाल्या.
मॉनिटर म्हणून निवड न झाल्यानं ध्रुवराज अतिशय उदास होता. त्यानं बाहेर खेळायला जाणंदेखील बंद केलं होतं. ध्रुवराजनं मंगळवारी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं. त्यानं जेवणासही नकार दिला. त्याच्या आईनं अनेकदा दरवाजा वाजवून त्याला आवाज दिला. मात्र ध्रुवराजनं प्रतिसाद दिला नाही. यानंतर ध्रुवराजच्या आईनं शेजाऱ्यांच्या मदतीनं दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना ध्रुवराजचा मृतदेह आढळून आला. त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.