चिंताजनक! शाळेत प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्याला हार्ट अटॅक; काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 06:02 AM2023-07-12T06:02:39+5:302023-07-12T06:03:37+5:30
आरोग्याची काळजी न घेणे बेततेय जिवावर
नवी दिल्ली - २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ झाल्याने आता वयाच्या केवळ १७व्या वर्षी दहावीतील विद्यार्थ्यांचा शाळेत प्रार्थना सुरू असतानाच हार्टअटॅक आल्याने मृत्यू झाला. अनियमित दिनचर्या आणि आपण जे दररोज बाहेरील अन्नपदार्थ खातो, त्यामुळे हृदयविकाराला आमंत्रण मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एका अभ्यासानुसार, भारतात ३ कोटींहून अधिक लोक हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रासले आहेत. भारतात दर ३ सेकंदाला एका व्यक्तिचा हृदयविकाराने मृत्यू होत आहे. यामध्ये ५० टक्के लोक ५० वर्षांवरील आहेत. २५ टक्के लोक ४० वर्षांचे आहेत, तर यापेक्षा कमी वयाच्या लोकांची संख्याही वाढत आहे.
हार्ट अटॅकच्या काही घटना
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात सोमवारी ३१ वर्षीय तरुणाचा जिमनंतर मृत्यू झाला.
खम्मममध्ये रविवारी ३३ वर्षीय नागराजू यांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.
गेल्या महिन्यात तेलंगणातील जगतियालमध्ये बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तिचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील बापटला येथे मार्च महिन्यात एका शाळेतील शिक्षकाचा मुलांना शिकवताना हार्ट अटॅकने वर्गातच मृत्यू झाला.
फेब्रुवारीमध्ये, बॅडमिंटन खेळताना २८ वर्षीय व्यक्तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
२५ फेब्रुवारी रोजी एका १९ वर्षीय मुलाचा लग्नात डान्स करताना मृत्यू झाला होता.
जिममध्ये व्यायाम करताना २४ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला होता.
हळदी समारंभात एका तरुणाला चक्कर आली आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला होता.
नशेमुळे हृदयाचे मायकार्डियल स्नायू कमकुवत होऊ लागतात. या स्नायूंपासूनच हृदय तयार होते. या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे, हृदयाच्या ठोक्याचा वेग असामान्य होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
हार्ट अटॅकची प्रमुख कारणे...
धूम्रपान करणे, जंकफूडचे सेवन करणे, मद्यपानामुळे वाढते ब्लडप्रेशर, जास्त काम, सतत तणाव
१८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण सिगारेट आणि दारूचे सेवन करू लागले आहेत, जे हृदयविकाराचे प्रमुख कारण बनत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भोपाळमध्ये एका १७ वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता.