विद्यार्थी नेत्याला अटक

By Admin | Published: February 13, 2016 03:55 AM2016-02-13T03:55:22+5:302016-02-13T03:55:22+5:30

दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी सभेचे अध्यक्ष कन्हय्याकुमार यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. देशाची एकता आणि अखंडतेवर

Student leader arrested | विद्यार्थी नेत्याला अटक

विद्यार्थी नेत्याला अटक

googlenewsNext

- कार्यक्रम राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप

नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी सभेचे अध्यक्ष कन्हय्याकुमार यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. देशाची एकता आणि अखंडतेवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या कोणालाही हा देश कदापि माफ करणार नाही, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत गृहमंत्री राजनाथसिंग, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींनी शुक्रवारी या अटकेचे समर्थन केले.
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातला गुन्हेगार अफझल गुरूच्या फाशीला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी जेएनयू परिसरात विद्यार्थ्यांच्या एका समूहाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले. वस्तुत: विद्यापीठाच्या प्रशासनाने या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती. अभाविपने हा कार्यक्रम राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप करीत त्याला कडाडून विरोधही केला होता. तरीही तणावपूर्ण आणि संतप्त वातावरणात हा कार्यक्रम अखेर झालाच व त्यात भारतविरोधी घोषणाही दुमदुमल्या.

नाहक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप
डाव्या पक्षांनी कन्हय्या कुमार याच्या अटकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एक राजकीय पक्ष या नात्याने कुठल्याही राष्ट्रविरोधी कृतीची आम्ही निंदा करतो. अशा कारवायांमध्ये दोषी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी.
मात्र अभाविपच्या इशाऱ्यावर डाव्या विद्यार्थी संघटनांना आणि भाकपच्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य असलेले कन्हय्या कुमार यांना नाहक लक्ष्य केले जात आहे, असे भाकपा नेते डी राजा म्हणाले. माकपा नेते सीताराम येचुरी यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर नाराजी व्यक्त केली.
न्यायालयात कन्हय्या कुमार याने स्वत:वरील सर्व आरोप खोडून काढले. निवडणुकीतील पराभवामुळे सूडबुद्धीतून अभाविप मला लक्ष्य करीत आहे. नारेबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जेएनयू विद्यार्थी संघटनेशी काहीही संबंध नाही. घोषणाबाजी करणारे विद्यार्थी व अभाविप सदस्यांमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर मी घटनास्थळी पोहोचलो होतो, असेही त्याने सांगितले.

पोलिसात लेखी तक्रार
या घटनेची दखल घेत पूर्व दिल्लीचे भाजपचे खासदार महेश गिरी यांनी दिल्ली पोलीसांकडे लेखी पत्रादारे रितसर तक्रार दाखल करून चौकशी व कारवाईची मागणी केली. मग या तमाम घटनांची गांभीर्याने दखल घेत गृहमंत्री राजनाथसिंगांनी जेएनयु परिसरात योजलेला आक्षेपार्ह कार्यक्रम व त्यात देण्यात आलेल्या भारत विरोधी देशद्रोही घोषणा यांच्याशी संबंधित व्यक्तिंवर त्वरेने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी सभेचे अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांना पाठोपाठ देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

तडकाफडकी चौकशीचे आदेश
अफझल गुरूच्या संदर्भात जेएनयू परिसरात आयोजित करण्यात आलेला हा काही पहिलाच कार्यक्रम नाही. तथापि प्रसंगाचे गांभीर्य ओळखून जेएनयू प्रशासनाने तडकाफडकी चौकशीचे आदेश दिले. अभाविपचे मात्र या आदेशाने समाधान झाले नाही. सर्व स्तरांवर सक्त कारवाईच्या मागणीचा त्यांनी जोरदार पाठपुरावा केला. दरम्यान जेएनयू कॅम्पस ज्या जमिनीवर उभे आहे, त्या मुनिरका गावातील लोकांच्या एका गटानेही जेएनयू परिसरात निदर्शने केली. जेएनयूची जमीन मुनिरका गावची आहे. या भूमीवर भारतविरोधी घोषणा आम्ही कदापि सहन करणार नाही, असे या निदर्शकांचे म्हणणे होते.

Web Title: Student leader arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.