विद्यार्थ्याची हत्या; पालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, पोलिसांचा लाठीमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:50 AM2017-09-11T01:50:08+5:302017-09-11T01:51:44+5:30
रायन इंटरनॅशनल स्कूलमधील ७ वर्षीय मुलाची हत्या झाल्यानंतर, संतप्त पालक रविवारी रस्त्यावर उतरले. पालकांसह शेकडो नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करत सीबीआय चौकशीची मागणी केली. शाळेजवळील दारूच्या दुकानाला या जमावाने आग लावली. त्यानंतर, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला.
गुरुग्राम : येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील ७ वर्षीय मुलाची हत्या झाल्यानंतर, संतप्त पालक रविवारी रस्त्यावर उतरले. पालकांसह शेकडो नागरिकांनी शाळेसमोर आंदोलन करत सीबीआय चौकशीची मागणी केली. शाळेजवळील दारूच्या दुकानाला या जमावाने आग लावली. त्यानंतर, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला.
या आंदोलनाच्या वेळी काही छायाचित्रकारांच्या कॅमेºयाचे नुकसान झाले. पोलिसांनी सांगितले की, काही आंदोलकांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध आपला राग व्यक्त करत, शाळेच्या परिसरात दारूच्या बाटल्या फेकल्या. दारूचे दुकान शाळेपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. जोपर्यंत सीबीआय चौकशी जाहीर होत नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी पालक करत होते.
गुरुग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी रविंदर कुमार यांनी सांगितले की, आंदोलकांना पांगविण्यासाठी हलका लाठीमार करण्यात आला, तर २० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलकांनी असा आरोप केला की, रिकाम्या वेळेत शाळेचे चालक आणि कंडक्टर कधी कधी दारू दुकानातून दारू घेऊन पितात.
शाळेची मान्यता रद्द होऊ शकत नाही
हरयाणा सरकारने स्पष्ट केले आहे की, शाळा व्यवस्थापन व मालकाविरुद्ध ‘पॉस्को’ कायद्याखाली गुन्हा नोंदविला आहे. पालक समाधानी नसतील, तर तपास सीबीआयकडेही देण्याची आमची तयारी आहे. राज्याचे शालेश शिक्षणमंत्री राम बिलास शर्मा म्हणाले की, शाळा व्यवस्थापनाकडून निष्काळजीपणा झाला आहे. शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकत नाही. कारण १२०० विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
काय आहे प्रकरण?
गत शुक्रवारी रायन इंटरनॅशनल स्कूलच्या शौचालयात प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याचा गळा कापलेला मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर, पालकांमधून संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बस कंडक्टर अशोककुमार याला ताब्यात घेतले आहे.