विद्यार्थ्यांनो सावधान : देशात २३ विद्यापीठे व ३४१ तंत्रशिक्षण संस्था बोगस

By admin | Published: March 20, 2017 07:38 PM2017-03-20T19:38:11+5:302017-03-20T19:38:11+5:30

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)ची मान्यता नसलेली देशाच्या विविध राज्यात २३ बोगस विद्यापीठे आहेत. ज्यांना पदव्या प्रदान करण्याचा कोणताही अधिकार नाही.

Students, beware: 23 universities and 341 technical institutes in the country | विद्यार्थ्यांनो सावधान : देशात २३ विद्यापीठे व ३४१ तंत्रशिक्षण संस्था बोगस

विद्यार्थ्यांनो सावधान : देशात २३ विद्यापीठे व ३४१ तंत्रशिक्षण संस्था बोगस

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली, दि. 20  : विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)ची मान्यता नसलेली देशाच्या विविध राज्यात २३ बोगस विद्यापीठे आहेत. ज्यांना पदव्या प्रदान करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याचप्रमाणे आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ची मान्यता नसलेल्या देशात ३४१ संस्था व महाविद्यालये आहेत, ज्यांना तंत्रशिक्षण क्षेत्रात पदवीचे शिक्षण देण्याची अनुमती नाही. तरीही विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ करीत बिनबोभाट त्यांनी आपला कारभार चालवला आहे. अशी विद्यापीठे व तंत्रशिक्षण संस्थांची त्वरित चौकशी करून त्यांच्या विरूध्द पोलीस तक्रार करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवावी, अशा सुचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्य सरकारांना दिल्या आहेत, राज्यसभेत ही माहिती मनुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी दिली.

देशात (युजीसी)ची मान्यता नसलेल्या २३ बोगस विद्यापीठांपैकी ७ बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत आहेत तर महाराष्ट्रात नागपूर येथे राजा अरेबिक विद्यापीठाचे नाव युजीसीच्या अमान्य विद्यापीठांच्या यादीत आहे. तंत्रशिक्षण क्षेत्रात देशातल्या ३४१ संस्था व महाविद्यालयांना (एआयसीटीई) ची मान्यता नाही. यापैकी दिल्लीत ६६ तर मुंबई आणि महाराष्ट्रात एकुण ७७ संस्था आहेत. महाराष्ट्रातल्या बोगस संस्थांमधे मुंबईत ४१, नवी मुंबईत ११, ठाण्यात ११, कल्याणला २, याखेरीज पुण्यात ७, नाशिक जिल्हयात ३, कोल्हापूर, अहमदनगर व औरगाबाद येथे प्रत्येकी १ अशी त्यांची विभागणी आहे. युजीसी www.ugc.ac.in व एआयसीटीईच्या www.aicte-india.org वेबसाईटवर या बोगस विद्यापीठे व अमान्य तंत्रशिक्षण संस्था व महाविद्यालयांची संपूर्ण यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

देशभर पुढल्या महिन्यात विविध महाविद्यालये व विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. यावेळी तमाम विद्यार्थ्यांनी आपण प्रवेश घेत असलेले विद्यापीठ, संस्था अथवा महाविद्यालयास युजीसी अथवा एआयसीटीई ची मान्यता आहे की नाही, याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. दिल्लीखेरीज, मुंबई, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, तेलंगणा, प.बंगाल, या ठिकाणी बोगस विद्यापीठे व बोगस तंत्रशिक्षण संस्थाचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी प्रदान केलेल्या तथाकथित पदव्या अथवा प्रमाणपत्रांची किंमत रद्दी कागदापेक्षा अधिक नाही. याची जाणीव युवीसी व एआयसीटीई ने आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या या बोगस विद्यापीठे व संस्थांच्या यादीने करून दिली आहे.
 

Web Title: Students, beware: 23 universities and 341 technical institutes in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.